हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होणारी मुलगी झाली हो हि मालिका आणि मालिकेतील कलाकार गेल्या महिन्याभरापासून चर्चेत आहेत. याचे कारण म्हणजे या मालिकेत विलास पाटील हि भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने यांची प्रॉडक्शनने केलेली हकालपट्टी. यानंतर किरण मानेंनी आपण राजकीय भूमिका घेत असल्यामुळे आपल्याला काढून टाकलं असे सांगितले तर वाहिनी आणि प्रॉडक्शनने मानेंवर गंभीर आरोप लावले. यानंतर मनोरंजन सृष्टी ते महाराष्ट्रातील राजकारण पूर्ण ढवळून निघालं. मात्र हे प्रकरण काही थांबलं नाही आणि संपलंही नाही. यानंतर आज दुपारी ३.३० वाजता मुंबईतील प्रेस क्लब येथे किरण माने प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत अशी माहिती त्यांनी स्वतःच दिली आहे. तर याआधी त्यांनी अश्या काही पोस्ट केल्या आहेत कि बस्स… या पोस्टमध्ये त्यांनी काय म्हटलंय हे जाणून घ्या खालीलप्रमाणे:-
किरण माने यांनी अगदी तासभरपूर्वी केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले कि, आज दुपारी ३.३० वाजता प्रेस काॅन्फरन्स घेतोय. मुंबई प्रेस क्लबला. मी आणि माझे वकील असिम सरोदे समस्त मराठी कलाकारांनो, मी तुमच्यासाठी लढतोय. तुम्ही माझे समर्थक, विरोधक वा संभ्रमित कुणीही असाल पण तरीही हा हॅशटॅग किरण माने पॅटर्न तुमच्या सुरक्षिततेसाठी आहे. तुम्ही स्टाग्लर असाल किंवा नव्वळ, स्त्री असाल वा पुरुष. कुणीही कुणासोबत गैरवर्तन करणार नाही. कुणी माता भगिनी कुणावर खोटे आरोप करताना विचार करतील. सेटवर तुम्हाला जात सांगायला लाज वाटणार नाही आणि कुणी अन्य तुमच्यासमोर जातीचा तोरा करणार नाही. आता फक्त गुणवत्ता तपासली जाईल .आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, तुमची जी काही विचारधारा असेल-राजकीय विधानं असतील, ती सोशल मिडीयावर मांडण्याचं तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल.
मी आणि माझे वकील असिम सरोदे तीन कायदेशीर बाबींवर बोलणार आहोत. ज्यामुळे प्राॅडक्शन हाऊस अडचणीत येणार आहे. सगळी शक्ती पणाला लावूनही त्यातून मार्ग काढणं त्यांना महामुश्कील होईल. हे मुद्दे माझ्या केसला ‘युनिव्हर्सल’ बनवतात. यात माझ्या करीयरचा बळी जाऊ शकतो. पण नंतर तुम्ही ‘तरणार’ आहात हे लक्षात घ्या. …दूसरं – काही हिंदी प्राॅडक्शन हाऊसने मराठीत खुप घाण केली आहे. त्यांचे ‘रंगीले रतन’ मराठीतलं ‘चालचलन’ बिघडवतायत… त्या माजोरड्यांना हा मेसेज गेला पायजे की एखादा ‘मराठी कलाकार’ नडला तर तुमचा बाजार उठवंल ! हा महाराष्ट्र आहे भावांनो !! छ.शिवाजी महाराज आणि शाहू-फुले-आंबेडकरांनी आमच्या हक्कांसाठी आयुष्य खर्ची घातलंय… आम्ही त्यांच्या विचारांचे पाईक आहोत… आमचा नाद करू नका.
जय जिजाऊ.. जय शिवराय… जयभिम… तुकाराम महाराज की जय !
तर याआधी किरण मानेंनी गुरुवारी एक पोस्ट केली होती. यात त्यांनी लिहिले होते कि, उद्या प्रेस काॅन्फरन्स घेतोय यात अनेक गुपितं उलगडायची आहेत. हा आता माझा एकट्याचा लढा नसून सगळ्यांचा झालाय. तुमी कुठल्याबी क्षेत्रात असा, तुमाला न सांगता-गुपचूप कटकारस्थान करून तुमाला कामावरनं काढायची छाती नाय झाली पायजे कुनाची. कुठलीबी स्त्री असो वा पुरूष..तुमच्यावर खोटे आरोप करताना हजारवेळा इचार करंल असं कायतर करून दाखवतो…संविधानिक मार्गानं.. बघाच तुमी ! #किरण_माने_पॅटर्न हितनं फुडं तुमच्यावर कस्लाबी अन्याय होऊ देनार नाय !!! अशा आशयाच्या जळजळीत पोस्ट करून किरण माने यांनी आपली भूमिका आणखी तीव्रपणे मांडली आहे. याशिवाय उद्या…४ फेब्रुवारी.. दुपारी ३.३० वाजता, मी आणि माझे वकिल असिम सरोदे-रमा सरोदे प्रेस काॅन्फरन्स घेतोय… मुंबई प्रेस क्लब.. आझाद मैदान पोलीस स्टेशनसमोर, मुंबई. जमलं तर या. असे लोकांना आवाहनदेखील केले आहे. आता किरण माने काय खुलासे करतात हे पाहून महत्वाचं ठरणार आहे.