Take a fresh look at your lifestyle.

संतोष जुवेकरने सांगितली स्ट्रगलच्या काळात साथ देणाऱ्या जेवणाच्या थाळीची भावुक आठवण; पहा व्हिडीओ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। इंडस्ट्री कोणतीही असो त्या इंडट्रीमधील कलाकार कोणताही असो ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या जागी पोहोचण्यासाठी बराच काळ द्यावा लागतो. घाम गाळावा लागतो. रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करावी लागते. जमिनीची गादी आणि आभाळाची चादर घ्यावी लागते. जो अश्या परिस्थितीला सुद्धा आपलं करून जगायला शिकतो तो आयुष्याच्या शर्यतीत कधीच हरत नाही असं म्हणतात. हे स्ट्रगल कुणाच्याही आयुष्यात चुकलेले नसते. प्रत्येकाला मोठं व्हायचं असेल तर स्ट्रगलची पायरी चढावी लागतेच. अश्याच स्ट्रगलची आठवण सांगणारा एक किस्सा मराठी अभिनेता संतोष जुवेकर याने किचन कल्लाकार या मराठी शोमध्ये सांगितली. सध्या संतोषचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

मराठी वाहिनी झी मराठीवरील किचन कल्लाकार शो अगदी कमी काळात लोकप्रिय झाला आहे. यामध्ये अभिनेता संतोष जुवेकर, श्रुती मराठे, वैभव तत्ववादी या लोकप्रिय कलाकारांनी अलीकडे हजेरी लावली होती. यावेळी संतोषच्या आयुष्यातील स्ट्रगलच्या काळातील एक किस्सा शो होस्ट संकर्षण कऱ्हाडेने मांडला आणि अखेर संतोष व्यक्त झाला. एक वेळच्या अन्नासाठी एकेकाळी काय संघर्ष करावा लागत होता. पण त्या परीस्थितीवर मात करून संतोषने एक वेगळी ओळख निर्माण केली. हा व्हिडिओ लोकांना अगदीच भावुक करणारा ठरतोय. अभिनेता संतोष जुवेकरने हा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामच्या अधिकृत हँडलवर शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तो म्हणतो की, हसवता हसवता अचानक जुन्या आठवणींना हात घातला आणि…….’

या व्हिडिओत संतोष म्हणताना दिसत आहे की, ज्यावेळी मी माझ्या कारकिर्दीला सुरुवात केली होती, त्यावेळी माझ्याकडे जेवणासाठी देखील पैसे नसायचे. मी कधी या मित्राकडे तर कधी त्या मित्राकडे तर कधी मावशीकडे जेवण करायचो. पण रोज रोज जेवायला कोण देणार? मग खार स्टेशनच्या बाहेर एक हातगाडी लागते. जिथे २० रुपयात थाळी मिळायची. त्यामध्ये तीन पोळ्या, बटाट्याची भाजी, भात, लिंबाचं किंवा कैरीच लोणचं आणि मिरची कांदा असायचं. तिथे जेवायला लागलो. मग जेवत असताना कोणी फोन केला आणि की कुठे आहेस विचारलं. तर सांगायचो की, लिलामध्ये आहे. पण, खरंच ही खूप जवळची गोष्ट आहे माझ्या. आयुष्यामधील या खडतर टप्प्यांनी ताठ मानेने जगण्याची दिलेली शिकवण खूप काही सांगून जाते. संतोषचा हा किस्सा ऐकून मंचावरील कलाकार आणि एकंदरच पाहणारे प्रेक्षकदेखील भावुक झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.