Take a fresh look at your lifestyle.

अभिनेता सिद्धार्थ सूर्यनारायणला जीवे मारण्याची धमकी; भाजप IT सेलवर केला नंबर लीक केल्याचा आरोप

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘रंग दे बसंती’ फेम अभिनेता सिद्धार्थ सूर्यनारायण याला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. असे असून अनोळखी नंबरवरून त्याला शिवीगाळही होत आहे. यानंतर सिद्धार्थने ट्विटरच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या तमिळनाडू आयटी सेलवर गंभीर आरोप केला असून त्यांनीच आपला नंबर लिक केल्याचा दावा केला आहे. त्याने हे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनाही टॅग केलेले आहे.

या ट्वीटमध्ये अभिनेता सिद्धार्थने म्हटले आहे कि, ‘माझा फोन नंबर तमिळनाडू भाजप आणि भाजप तमिळनाडू आयटी सेलने लिक केला आहे. गेल्या २४ तासात शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी आणि बलात्कार करण्याच्या धमकीचे ५०० हून अधिक फोन मला आणि माझ्या कुटुंबियांना आले आहेत. सर्व फोन कॉल्स रेकॉर्ड करण्यात आले असून पोलिसांना देण्यात आले आहेत. तसेच मी शांत राहणार नाही, तुमचे प्रयत्न सुरु ठेवा’, असे म्हणत सिद्धार्थने हे ट्विट पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा यांना टॅग केले आहे.

दरम्यान सिद्धार्थने एक स्क्रिनशॉट ट्विटरवर शेअर केला आहे. यात त्याने सोशल मीडियाद्वारेही त्याला धमकी मिळत असल्याचे म्हटले आहे. तसेच तमिळनाडू भाजप आयटी सेलचे सदस्य माझा नंबर लिक करून माझ्यावर हल्ला करण्यासंदर्भात बोलत आहेत. सध्या संपूर्ण देश कोरोनाशी झुंज देत आहे, परंतु अशी मानसिकता असणाऱ्यांशी आपण जिंकू शकतो का? असा सवाल सिद्धार्थने उपस्थित केला आहे.

दरम्यान, स्कॅम १९९२ वेब सिरिजमध्ये पत्रकार सुचेता दलालची भूमिका भूषविलेली अभिनेत्री श्रेया धन्वंतरी हिने सिद्धार्थच्या ट्विटवर हे अपमानकारक असल्याचे म्हटले आहे.