Take a fresh look at your lifestyle.

गरिबांचा दाता अभिनेता सोनू सूदला झाली कोरोनाची लागण

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने अगदी थैमान घातला आहे. अश्या संकटाच्या काळात प्रत्येकजण आ वासून मदतीची अपेक्षा करीत आहे. अश्यावेळी दुरावलेल्यांना आपल्या प्रियजनांपर्यंत सुखरूप पोहोचवून माणुसकीचा धडा देणाऱ्या अभिनेता सोनू सूद याला कोरोनाची लागण झाली आहे. आपल्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवरून त्याने स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.

या ट्विटमध्ये त्याने लिहिले आहे, ‘नमस्कार मित्रहो,मी आपणाला सूचित करू इच्छितो, कि माझी कोविड१९ च्या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे मी स्वतःला क्वारंटाईन करून घेतले आहे. काळजी करण्यासारखी कोणतीही बाब नाही. याउलट माझ्याकडे आपल्या अडचणी नीट करण्यासाठी पहिल्यापेक्षा जास्त वेळ राहील. लक्षात असुद्या, कोणताही त्रास.. मी नेहमी आपल्या सोबत आहे. – सोनू सूद’. आपल्या ट्विटमध्ये त्याने पॉझिटिव्ह असल्याचे सांगत आपल्या चाहत्यांना दिलासा देत मी नेहमी आपल्या सोबत आहे असे म्हटले आहे.

सोनू नेहमीच सूद फाउंडेशन च्या अंतर्गत गरजूंना निःशुल्क मदत करीत असतो. गतवर्षी कोरोनाने कहर केला असता, आपल्या घरापासून दूरवर काम करणाऱ्या कष्टकऱ्यांना सोनूने त्यांच्या घरी सुखरूप पाठविण्याचे काम केले होते. यामुळे त्याची सर्व स्तरांवर कौतुकाने पाठ थोपटण्यात आली होती. अनेकांनी त्यास गरिबांचा दाता तर काहींनी त्याला देवासमान म्हटले होते. मात्र आता तो स्वतः कोरोनाच्या जाळ्यात जखडला आहे. सोशल मीडियावर त्याची पोस्ट पाहताक्षणी त्याच्या चाहत्यांनी गेट वेल सून अश्या कमेंट्स केल्या आहेत.

अभिनेता सोनू सूद याने हिंदी सह दाक्षिणात्य चित्रपटांतही दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. आपल्या अभिनय शैलीने त्याने स्वतःचा असा वेगळा प्रेक्षक वर्ग तयार केला आहे. रेम्बो राजकुमार, दबंग, सिम्बा, एंटरटेनमेंट, हैप्पी न्यू इयर अश्या अनेक चित्रपटांतून त्याने काम केले आहे. प्रत्येक चित्रपटात त्याने अलग भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.