‘.. मी मनातल्या मनात तुला गुरु मानू लागले’; अमृताची खास माणसासाठी खास पोस्ट
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित बहुचर्चित आणि आता बहुप्रतिक्षित असणारा ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेत आहे. प्रसाद ओकचे दिग्दर्शन, आदिनाथ कोठारेचा रांगडेपणा आणि अमृताची घायाळ करणारी अदा यासह अजय अतुलचे संगीत व सुमधुर आवाजांचा स्वरसाज याने अगदीच मंत्रमुग्ध व्हायला होत आहे. प्रत्येक बाजूत उजवा असणारा चंद्रमुखी चर्चेत असण्यामागे हि प्रत्येक बाब कारणीभूत आहे.
अलीकडेच या चित्रपटातील गाणी प्रदर्शित होऊ लागली असताना यातील स्वर आणि नृत्याने प्रेक्षकांना मोहले आहे. या चित्रपटातील प्रत्येक नृत्य दिग्दर्शनामागे सिनेसृष्टीतील नामांकित नृत्य दिग्दर्शक आशिष पाटील आणि दीपाली विचारे यांचे कष्ट आहेत. दरम्यान चंद्रमुखीतील चंद्रा हे मुख्य पात्र साकारणारी अभिनेत्री अमृता खानविलकर हिने नृत्य दिग्दर्शक आशिष पाटीलसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे आणि हि पोस्ट नेहमीप्रमाणे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
अमृता नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. त्यामुळे तिने हि खास पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने चंद्रमुखीतील लावणी नृत्य आणि हावभावांचे चाहत्यांकडून होणारे कौतुक हे आशिष पाटील यांच्या सहकार्यामुळे असल्याचे सांगत त्यांच्या नृत्याचे विशेष कौतुक केले आहे. तसेच तिने चंद्रमुखी या चित्रपटातील लावण्यांचे नृत्य दिग्दर्शन केल्याच्या निमित्ताने त्याचे आभारही मानले आहेत. या पोस्टच्या सुरुवातील #चंद्रासांगतेएका असा हॅशटॅग तिने वापरला आहे. हि पोस्ट लिहिताना आणि शेअर करताना अमृताने चंद्रमुखी चित्रपटातील अलीकडेच प्रदर्शित झालेले ‘बाई गं’ या बैठकीच्या लावणीवरील नृत्य आशिष पाटीलसोबत सादर करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
या पोस्टमध्ये अमृताने लिहिले आहे कि, “आशु…,तुला मी पहिल्यांदा एका हिंदी show मधे नाचताना पाहिलं होतं. तेव्हाच मनात ठरवलं होतं …. ह्याला गाठायचं आणि सांगायचं काय रे बाबा तुझी passion … तुझा grace मी फिदा झाले तुझ्या वर … मग आपली भेट झाली आणि मी ते तुला सांगितलं हि आणि आज पर्यंत सांगतेय आणि ह्या पुढेही सांगत राहणार. अनेक shows मधून आपण एकत्र काम केल …. मग lockdown मध्ये आपण #amritkala करायचं ठरवलं …. आणि मी मनातल्या मनात तुला गुरु मानू लागले … तुझ्या passion ने ….कलेच्या साधनेने मला वेड लावलं… मी विचार करायचे.. मी कधी आशु सारखी नाचणार ….
पुढे लिहिले कि, आज प्रेक्षक चंद्रमुखी सिनेमामधलं ‘बाई ग’ बघतात आणि प्रचंड कौतुक करतात “ठेहराव”च…. हाव भावांचं…. आणि हे सगळं शक्य झालं तुझ्यामुळे आशु…. तू जशी दिशा दाखवलीस तशी चालत गेले. तुझे ह्या टप्यावर मी जरूर आभार मानीन, पण आपल्याला अजून खूप काही करायच आहे. so let’s rock ashu ….in your style”, असे लिहीत अमृताने पुढे ‘बाई गं’ गायची गायिका आर्या आंबेकर आणि संगीत देणाऱ्या अजय- अतुल तसेच शब्द रेखाटणाऱ्या गुरु ठाकूर यांचेही विशेष आभार मानले आहेत. हा चित्रपट २९ एप्रिल २०२२ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.