Take a fresh look at your lifestyle.

अभिनेत्री गहना वशिष्ठचे एकता कपूर आणि बालाजी टेलिफिल्म्सवर गंभीर आरोप; म्हणाली कि..,

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसह विविध प्रकरणांमध्ये नाव असलेल्या अभिनेत्री गहना वशिष्टने पुन्हा एकदा खळबळजनक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. अभिनेत्री गहना वशिष्ठ हिने निर्माती एकता कपूर आणि तिच्या बालाजी टेलिफिल्म्सवर गंभीर आरोप केले आहेत. गहना या व्हिडिओत सांगतेय कि, एकता कपूरमुळे मी आत्महत्या करणार होती. एकताच्या बालाजी फिल्म्सने माझे ३ महिने वाया घालावले. मी घरात बसून राहिले. माझ्याकडे पैसेही नाहीत. तिच्यामुळे माझं आर्थिक नुकसान झालं आहे. या संबंधित सर्व पुरावे आपल्याकडे असल्याचा दावादेखील गहनाने केला आहे. मात्र गहनाच्या या व्हिडीओवर एकता कपूर किंवा बालाजी टेलिफिल्म्स वा अल्ट बालाजीकडून अद्याप कोणतंही उत्तर देण्यात आलेलं नाही.

त्याच झालं असं कि, अल्ट बालाजी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अभिनेत्री कंगना रनौतचा ‘लॉक अप’ शो प्रसारित होतोय. या शोमध्ये विविध सेलिब्रिटींचा समावेश आहे. दरम्यान या शोमध्ये येण्यासाठी गहना वशिष्ठलाही निर्मात्यांनी संपर्क केला होता. शिवाय तसा करारसुद्धा केला होता. हा करार झाल्यानंतर ऐनवेळी त्यांनी शोमध्ये मला बोलावलं नाही आणि त्यामुळेच माझं बरंच नुकसान झालं, अशी तक्रार गहनाने केली आहे. आपल्यावर या गोष्टीमुळे किती वाईट वेळ आली असून आपण संकटात असल्याचे सांगतानाच एक व्हिडीओ गहनाने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

या व्हिडिओत बोलताना तिने म्हटले आहे कि, ‘लॉक अप’चे निर्माते स्वत:हून माझ्याकडे आले. यात आधी मानधनाविषयी चर्चा झाली. दर आठवड्याला दीड लाख रुपये मानधन देण्याचं त्यांनी ठरवलं आणि करार केला. संबंधित अधिकृत कागदपत्रे आणि चॅट्सचे पुरावे माझ्याकडे आहेत. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं, ‘मी गहना वशिष्ठ, मनापासून हे सर्व खरं बोलतेय. गेल्या तीन, साडेतीन महिन्यांपासून माझ्यासोबत काय घडलं, मी कोणत्या परिस्थितीतून गेले, माझ्या मनस्तापाचं कारण फक्त आणि फक्त बालाजी प्रॉडक्शन हाऊस आहे. त्यांच्यामुळेच मी माझ्या घरी कामाविना बसले. मला तुमचा पाठिंबा हवा आहे. माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. हा कोणताही पब्लिसिटी स्टंट नाही. मी कोणाचंही लक्ष वेधण्यासाठी हे सर्व करत नाहीये. हे कटू सत्य आहे. एका मोठ्या प्रॉडक्शन हाऊसचा हा खरा चेहरा आहे.’