हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या झी मराठीवर मन उडू उडू हि मालिका हळूहळू प्रेक्षकांचे मन जिंकताना दिसत आहे. या मालिकेत ‘दुर्वा’, ‘फुलपाखरु’ अश्या मालिकांच्या माध्यमातून तुफान लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री म्हणजे ऋता दुर्गुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आल्याचे दिसले. अभिनेता अजिंक्य राऊत या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकताना दिसतोय. उत्तम अभिनय आणि सौंदर्याच्या ऋताने तरुणाईच्या मनावर राज्य केले आहे. तर भन्नाट स्टाईल आणि हटके स्माईलच्या जोरावर अजिंक्य तरुणींच्या मनाला भूल पाडतोय. या मालिकेत हे दोघेही इंद्रा आणि दिपू या मुख्य भूमिकेत दिसत आहेत. यामुळे ते सतत चर्चेत असतात. पण नुकतेच हे दोघे मनसे पक्ष अध्यक्ष राज ठाके यांच्या भेटीला गेले होते आणि या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामुळे इंद्रा आणि दिपू राज ठाकरेंच्या भेटीला का गेले असा प्रश्न निर्माण होतोय. तर याचे उत्तर आहे मनसेचा दीपोत्सव.
व्हायरल होत असलेले फोटो पाहिल्यानंतर ऋता आणि अजिंक्यने नेमकी राज ठाकरे यांची भेट का घेतली? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला असेल तर यात काहीच वावगे नाही. कारण हा प्रश्न फारच साहजिक आहे. मन उडू उडू झालं मालिका फेम अभिनेत्री ऋता दुर्गुळे आणि अभिनेता अजिंक्य राऊत हे दोघेही राज ठाकरे व त्यांच्या कुटुंबियांना भेटले होते. याचे कारण म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित ‘दीपोत्सव’. होय. हा कार्यक्रम दरवर्षी ‘शिवतीर्थ’ (छत्रपती शिवाजी महाराज पार्क) येथे साजरा केला जातो. यावेळीदेखील या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या कार्यक्रमासाठी ऋता आणि अजिंक्यने हजेरी लावली होती. दरम्यान, या कार्यक्रमामध्ये राज ठाकरे यांच्यासह शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे, नितीन सरदेसाई, मनसैनिक आणि दादरकर उपस्थित होते.
या दीपोत्सवाचे काही फोटो मनसेच्या सोशल मीडिया अधिकृत पेजवर शेअर करण्यात आले आहेत. हेच फोटो सध्या सर्वत्र व्हायरल होत आहेत. या फोटोसह कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘दादर म्हणजे मुंबईतल्या मराठी संस्कृतीचे माहेरघर आणि इथल्या बहुरंगी बहुढंगी मराठमोळ्या संस्कृतीचे हृदय म्हणजे आपले ‘छत्रपती शिवाजी महाराज पार्क’! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे यंदाही आपले ‘शिवतीर्थ’ विद्युत दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित ‘दीपोत्सवा’चा शुभारंभ सौ. शर्मिलावहिनी ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. अमितजी ठाकरे, श्री. नितीन सरदेसाई, माहीम विभाग अध्यक्ष श्री. यशवंत किल्लेदार यांच्यासह लोकप्रिय अभिनेते श्री. अजिंक्य राऊत आणि श्रीम. ऋता दुर्गुले यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. याप्रसंगी पक्षाचे अनेक पदाधिकारी तसंच मोठ्या संख्येने ‘दादरकर’ उपस्थित होते. ‘दीपोत्सव’ शुभारंभाच्या निमित्ताने करण्यात आलेल्या फटाक्यांच्या आतिषबाजीने शिवतीर्थाचा आसमंतही बराच काळ लखलखत होता. अवघ्या मुंबईचे आकर्षण ठरलेला हा ‘दीपोत्सव’ १९ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.