Take a fresh look at your lifestyle.

जया बच्चन यांना कोरोनाची लागण; केजो’च्या आगामी चित्रपटाचे शूटिंग धोक्यात

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या दोन ते तीन वर्षांपासून संपूर्ण जगभरात कोरोना नामक महाभयंकर विषाणूने कहर माजवला आहे. दरम्यान सर्वसामान्य लोकांपासून ते राजकीय नेते मंडळी आणि कलाविश्वातही कोरोनाने अनेकांना गिळंकृत केल्याचे समोर आले आहे. यानंतर कोरोनाची लाट ओसरते असे वाटत असतानाच आता पुन्हा एकदा या विषाणूने आपली तीव्रता वाढवून हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. यानंतर सिनेसृष्टीतून मोठी बातमी समोर येत आहे. अमिताभ बच्चन यांच्या पत्नी, अभिनेत्री जया बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे. माहितीनुसार सध्या जया बच्चन या रॉकी और रानी चित्रपटाचे शूटिंग करत आहेत. त्यामुळे करण जोहरने तात्काळ शूटिंग थांबवले आहे.

करण जोहरच्या रॉकी और राणी की प्रेम कहानी या चित्रपटात जया बच्चन अत्यंत महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. मात्र त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे पूर्ण शूट थांबविण्यात आले आहे. याआधी दोन दिवसांपूर्वी चित्रपटातील अन्य मुख्य भूमिकेतील अभिनेत्री शबाना आझमी यांनादेखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. यामुळे वेळ न घालवता करण जोहरने चित्रपटाचे शूटिंग थांबवून शेड्यूल पुढे ढकललं आहे. हे वृत्त बॉलीवूड हंगामा या माध्यमाने जाहीर केले आहे.

याआधीदेखील बच्चन कुटुंबाने कोरोनाशी दोन हात केले होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत म्हणजेच २०२०मध्ये अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि नात आराध्या अभिषेक बच्चन यांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. मात्र, तेव्हा जया बच्चन यांना कोरोनाची लागण झाली नव्हती. अखेर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत या विषाणूने जया बच्चन यांनाही आपल्या जाळ्यात ओढले. तर अलीकडेच बच्चन कुटुंबाकडे गेली अनेक वर्ष कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यासदेखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. यानंतर आता जया बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे बच्चन कुटुंब पुन्हा एकदा चिंतेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व नियमांचे पालन करूनही सेटवर कोरोनाचा उद्रेक होत असल्याचे दिसून आले आहे.