Take a fresh look at your lifestyle.

अभिनेत्री केतकी चितळेला अटक; शरद पवारांवरील आक्षेपार्ह पोस्ट अंगलट

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी टीव्ही इंडस्ट्रीतील अभिनेत्री केतकी चितळे हिने काही तासांपूर्वी एक फेसबुक पोस्ट केली होती. या फेसबुक पोस्ट मध्ये तिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी अपमानकारक भाषेत टीका केली होती. यासाठी तिच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला होता आणि अखेर तिला ठाणे पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त समोर येत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून सध्या केतकीवर टीकेची झोड उठली आहे. सर्वत्र केतकीवर गुन्हा दाखल करण्यासाठी आणि तिच्यावर त्वरित कारवाई करण्यासाठी मागणी केली जात होती. यानंतर अखेर तिच्यावर ठाणे पोलिसांनी कारवाई केली आहे आणि तिला ताब्यात घेतलं आहे.

 

मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने आपल्या फेसबुक अकाउंटवरुन शरद पवारांची खिल्ली उडविणारे काव्य पोस्ट केले आहे. तिने पवारांवर शिंथोडे उडविण्याचा प्रयत्न केल्यामुळे सर्वत्र तिच्या पोस्टचा निषेध केला जात आहे. इतकेच नव्हे तर, मुंबई, कळवा, ठाणे, बीड, सातारा, कोल्हापूर अशा अनेक ठिकठिकाणी तिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात होती. महाराष्ट्रातून विविध ठिकाणी केतकीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला होता. शिवाय गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे कडक कारवाईची मागणी केली होती. तेव्हा गृहमंत्र्यांनी कारवाई होणारच असा इशारा दिला होता.

अभिनेत्री केतकी चितळे हिने फेसबुक पोस्ट केली होती आणि इतक्या ट्रोलिंग, टीकानंतरही तिने हि पोस्ट हटवली नाही. या पोस्टमध्ये तिने आपल्या पोस्टमध्ये लिहले आहे की,
तुका म्हणे पवारा । नको उडवू तोंडाचा फवारा II
ऐंशी झाले आता उरक । वाट पहातो नरक II
सगळे पडले उरले सुळे । सतरा वेळा लाळ गळे II
समर्थांचे काढतो माप । ते तर तुझ्या बापाचेही बाप II
ब्राह्मणांचा तुला मत्सर । कोणरे तू ? तू तर मच्छर II
भरला तुझा पाप घडा | गप! नाही तर होईल राडा II
खाऊन फुकटचं घबाड । वाकडं झालं तुझं थोबाड ||
याला ओरबाड त्याला ओरबाड । तू तर लबाडांचा लबाड || अशा आशयाची हि पोस्ट अभिनेत्रीकडून करण्यात आली आहे. यानंतर सोशल मीडियावरील वातावरण चांगलाच पेटलं आहे. अनेकांनी तिला शिवीगाळ करीत तिच्या पोस्टचा निषेध केलाय. तर काहींनी अगदी तिचे संस्कारही काढले आहेत. इतकेच नव्हे तर काहींनी तिला स्वयंघोषित अभिनेत्री सुद्धा म्हटले आहे.