Take a fresh look at your lifestyle.

अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या ड्रायव्हरला भररस्त्यात मारहाण; जुहू पोलिसांत तक्रार दाखल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिने इंडस्ट्रीतील नामांकित अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या ड्राइव्हरला किरकोळ वादातून भर रस्त्यात बेदम मारहाण करण्यात आली आहे. दरम्यान निवेदिता सराफ स्वतः या प्रसंगी तेथे होत्या. हि घटना रात्रीच्या वेळी घडली असून अगदी किरकोळ गोष्टीवरून हा प्रसंग निर्माण झाला. संबंधित व्यक्तीने निवेदिता सराफ यांना काच खाली कर असे म्हणत धमकावले आणि ड्रायव्हर अजय याला मारहाण देखील केली. यानंतर निवेदिता यांनी जुहू पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे.

मुंबईतल्या जुहू येथील जेव्हीपीडी जंक्शनजवळ ही संपूर्ण घटना घडली. रविवारी रात्री निवेदिता सराफ या आपल्या गाडीतून विलेपार्ले इथून घरी परतत होत्या. साधारण रात्रीचे १०.३० वाजले होते आणि जेव्हीपीडी सिग्नलजवळ एका कारने निवेदिता यांच्या गाडीला मागून धडक दिली. यावेळी निवेदिता यांचा ड्रायव्हर अजय ठाकूर ( वय वर्ष ३८) हा गाडीचे काही नुकसान तर झाले नाही ना हे पाहण्यासाठी खाली उतरला. दरम्यान गाडी ठोकणाऱ्या व्यक्तीने अजयला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि शिवीगाळ करत अजयला मारहाणही केली असे निवेदिता सराफ यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

तसेच “मारहाण करणाऱ्याने मलाही गाडीची काच खाली कर, असं म्हणत धमकावलं. अखेर अजयने पोलिसांना फोन करतो असं सांगताच त्याने तिथून पळ काढला. पळ काढत असतानाही त्याने एका बेस्ट चालकालाही शिवीगाळ केली,” असं निवेदिता यांनी सांगितलं. या घटनेची तक्रार जुहू पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून जुहू पोलिसांनी आरोपीच्या नाशिक नोंदणीकृत गाडीचा तपशील मागवला आहे. त्यासोबत सीसीटीव्ही फुटेजचाही तपास पोलीस करत आहेत. MH-15-BD-9945 या नंबरच्या गाडीची नाशिकमध्ये नोंदणी झाली आहे आणि आम्ही मालकाचा तपास करत आहोत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी सुधाकर शिरसाट यांनी दिली आहे.