Take a fresh look at your lifestyle.

अभिनेत्री उर्मिला निंबाळकरच्या घरी हिरोची एन्ट्री; आई झाल्याचा आनंद चाहत्यांसह केला शेअर

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठमोळी अभिनेत्री उर्मिला निंबाळकरने आज आई झाल्याची गोड बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे. तिने ३ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी एका गोंडस राजकुमाराला जन्म दिला आहे. हि आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसह शेअर करताना तिने माझ्या आयुष्यात हिरोची एन्ट्री झालीये, असे मजेशीर लिहीत एक पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी अगदी भरभरून प्रेम, शुभेच्छा आणि आशीर्वाद देणाऱ्या कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

उर्मिलाने हि आनंदाची बातमी शेअर करताना लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे कि, वडिलांवर, भावावर, सासऱ्यांवर आणि सगळ्यात जास्त चुकलं म्हणजे नव-यावर अती प्रेम असलं की, रंगभूमीपेक्षा जास्त नाट्यनिर्मिती ख-या आयुष्यात होऊन हिरोची एन्ट्री होते. माझ्या आयुष्यात ३ ऑगस्टला सकाळी हिरोची एन्ट्री झालीये. उर्मिलाच्या या पोस्टनंतर तिच्यावर अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होतोय. मनोरंजन विश्वातील कलाकारांनी तिचे अभिनंदन केले आहे. तिच्या पोस्टवर स्वप्निल जोशी, जुई गडकरी अशा अनेक कलाकारांनी कमेंट्स केल्या आहेत.

मराठमोळ्या उर्मिला निंबाळकरने काही महिन्यांपूर्वी प्रेग्नेन्सीची माहिती दिल्यानंतर आपल्या बेबी बंपचा फोटो शेयर केला होता. यानंतर डोहाळे जेवणाचे फोटोही तिने शेअर केले होते. या नऊ महिन्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद तिने घेतला आणि अखेर आता एका चिमुकल्याच्या रूपाने तिच्या पदरी आनंद आला आहे. या क्षणाची ती आतुरतेने प्रतीक्षा करत होती. दरम्यान बेबी बंपच्या फोटोंवरून ती सोशल मीडियावर ट्रोल झाली होती. तर त्यावर तिने सडेतोड उत्तरदेखील दिले होते.