हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। चावटपणाचा फुल्ल ऑन कहर घेऊन ते ३ बॉईज परत येत आहेत. होय. अवधूत गुप्तेच्या ‘बॉईज’, ‘बॉईज २’ या चित्रपटांच्या भरघोस यशानंतर आता बॉईज ३ लवकरच प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज आहे. अलीकडेच या चित्रपटाचा टिझर आणि मोशन पोस्टर सोशल मीडियावर रिलीज झाला होता. यामध्ये ओळखीचे तीन बॉईज तर होते पण नवा चित्रपट, नवी कथा मग नवी हिरोईन नको का..? ती नवी हिरोईन अर्धी मुर्धी दिसत असल्यामुळे नेटकऱ्यांनी विविध अभिनेत्रींच्या नावावर चर्चा केली. यामध्ये सगळ्यात जास्त ट्रेंडिंगवर नाव होतं ते अभिनेत्री विदुला चौगुलेचं आणि झालंही तसंच.
सध्या सोशल मीडियावर बॉईज ३ ची जबरदस्त चर्चा आहे. त्यात नव्या कथानकाला साजेशी नवी हिरोईन म्हणून अभिनेत्री विदुला चौगुलेची भारी एंट्री झाली आहे. सोशल मीडियावर तिच्या एंट्रीचा प्रोमो रिलीज झाल्यानंतर पोस्टरमधली ती कोण..? याच उत्तर मिळालं आहे. शिवाय एंट्रीलाच विदुलाने कहर डायलॉगबाजी केली आहे. आयला चड्डीतली पोरगी बघायची सवय नाय काय..? असा हटके आणि बोल्ड डायलॉग मारून विदुलाने बॉईज ३ मध्ये ढुंग्या, धैर्या आणि कबीरच्या आयुष्यात प्रवेश केला आहे. आता खरी मजा तर त्यांच्या आयुष्यात होणाऱ्या उलथापालथ बघण्यात येणार आहे. त्यामुळे हा चित्रपट कधी एकदा रिलीज होतोय अशी सगळ्यांनाच उत्सुकता आहे.
अभिनेत्री विदुला चौगुले हिने कलर्स मराठीवरील ‘जीव झाला येडापीसा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात आणि मनामनांत जागा मिळवली. यानंतर आता थेट मराठी चित्रपटात तिने पदार्पण केले आहे. बॉईज ३ हा विदुलाचा पहिलाच आणि हटके प्रोजेक्ट आहे. त्यामुळे ती स्वतः सुद्धा फारच उत्सुक आहे. सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटच्या सहयोगाने अवधूत गुप्ते प्रस्तुत चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल सखाराम देवरुखकर यांनी केले आहे. तर लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे व संजय छाब्रिया ‘बॉईज ३’चे निर्माते आहेत.