Take a fresh look at your lifestyle.

कोठारेंच्या शिरपेचात मानाचा तुरा; बुर्ज खलिफावर स्थान मिळवणारा आदिनाथ ठरला पहिला मराठी अभिनेता

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीत आपल्या उठावदार अभिनयाची छाप पाडणारा अभिनेता आणि दिगदर्शक आदिनाथ कोठरे दिनांक २४ डिसेंबर २०२१ रोजी बॉलीवूड सिनेइंडस्ट्रीमध्ये डेब्यू करणार आहे. कबीर खान दिग्दर्शित ’83’ या चित्रपटामधून आदिनाथ क्रिकेटर दिलीप वेंगसरकर याच्या भूमिकेत दिसेल. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच दुबईच्या बुर्ज खलिफावर दाखवण्यात आला आहे. यामुळे आदिनाथ कोठारे हा पहिला मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक आहे ज्याचा ट्रेलर बुर्ज खलिफावर दाखवण्यात आलाय. ही बाब नक्कीच अभिमानाची, कौतुकाची आणि कोठारे कुटुंबाचा मान उंचावणारी आहे याद काही वादच नाही.

जगभरातून आदिनाथ कोठारेंच्या या कर्तृत्वाविषयी चर्चा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. याविषयी आपल्या भावना व्यक्त करताना अभिनेता आणि दिग्दर्शक आदिनाथ कोठारे म्हणतो कि, “मी आत्ता खूपच भावूक झालो आहे. जगातल्या सर्वात उंच इमारतीवर आपला चेहरा जगाला दिसणं हे कोणत्याही अभिनेत्यासाठी निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. ’83’ चित्रपटाचा ट्रेलर बुर्ज खलिफावर दाखवल्यापासून मला माझ्या कुटूंबाचे, मित्र परिवारांचे, चाहत्यांचे अभिनंदन करणारे भरपूर मेसेज येत आहेत. जगभरातून सध्या माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

पुढे म्हणाला, आपल्या कुटूंबाला – चाहत्यांना आपला गर्व वाटावा, असं काही करायला मिळणं प्रत्येक अभिनेता-दिग्दर्शकासाठी गौरवाची गोष्ट आहे. मला असं वाटत कि माझ्यासाठी हे फार अविस्मरणीय आहे. एकंदरच २०२१ हे वर्ष आदिनाथ कोठारे आणि त्याच्या कुटुंबासाठी अविस्मरणीयच वर्ष म्हणावं लागेल. याचे कारण म्हणजे यंदा आदिनाथला ‘पाणी’ या चित्रपटासाठी सर्वोच्च मानला जाणारा राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला आणि आदिनाथने डिजीटल विश्वात सिटी ऑफ ड्रिम्स वेबसीरिजव्दारे पदार्पण केले. यानंतर आता थेट बुर्ज खलिफा. मग काय चर्चा तर होणारच ना!

अभिनेता आदिनाथ कोठारे हा मराठी लोकप्रिय अभिनेता महेश कोठारे यांचा मुलगा आहे. आदिनाथने ‘माझा छकुला’ या मराठी चित्रपटाद्वारे त्याच्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात त्याने एका बाल कलाकाराच्या भूमिकेत अभिनयाची छाप पाडली. त्यानंतर त्याने त्याचे वडील महेश कोठारे यांच्या अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. झपाटलेला २, सतरंगी रे यांसारख्या अनेक चित्रपटांमधील त्याच्या भूमिकांना प्रेक्षकांचे प्रेम आणि कौतुक नेहमीच मिळाले आहे.