Take a fresh look at your lifestyle.

‘चुकीला माफी नाही..’; माफीनाम्यानंतरही अक्षय कुमार होतोय ट्रोल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक कलाकार तंबाखूजन्य उत्पादनांच्या जाहिराती करताना दिसतात. यामुळे चाहत्यांनी नाराजी व्यक्त करताना अशा कलाकारांना सोशल मीडियावर ट्रोल केले होते. यामध्ये बॉलिवूड अभिनेते शाहरुख खान, अजय देवगण आणि अक्षय कुमार अशा कलाकारांचा समावेश होता.

दरम्यान आपल्या चाहत्यांची नाराजी पाहता अभिनेता अक्षय कुमार याने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांची माफी मागत अशा ब्रॅंड्ससाठी पुन्हा काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे खरतर चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनीदेखील त्याचे कौतुक करणे अपेक्षित होते. मात्र येथे उलट चित्रपट पहायला मिळत आहे. माफी मागूनही अक्षयला ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय.

सोशल मीडियावर अनेक नेटकरी अक्षय कुमारच्या माफीनाम्यावर टीकांचा मारा करताना दिसत आहेत. एका नेटकाऱ्याने लिहिले कि, ‘या जाहिरातीसाठी मिळालेलं मानधन परत करणार का?’ तर आणखी एकाने लिहिलं, ‘तुमच्या माफीचा काय फायदा आहे..? जाहिरात तर चालूच राहणार. हिंमत असेल तर ही जाहिरात बंद करून त्यांचे पैसे त्यांना परत करा.’ याशिवाय अन्य एकाने लिहिले कि, ‘तुम्ही हा करार मोडून त्या संबंधित ब्रँडला या जाहिरातीचं प्रसारण करणं बंद करायला का सांगत नाही. त्यानंतर तुम्हाला करार मोडण्यासाठी कराव्या लागणाऱ्या नुकसान भरपाईला तुम्ही घाबरता का?’ अशा अनेक प्रकारच्या विविध प्रतिक्रिया मतकरी देताना दिसत आहेत. एकंदरच काय तर अक्षयचा माफीनामा वायाच गेला असेच म्हणावे लागेल.

अक्षय कुमारने आपल्या माफीनाम्यात लिहिले होते कि, ‘मला माफ करा. माझे हितचिंतक आणि चाहते या सर्वांची मी सर्वांची माफी मागतो. ‘मी कधीही तंबाकुजन्य पदार्थांचे सेवन केले नाही. करणार नाही. विमल इलायचीसोबत असलेल्या माझ्या असोसिएशनवरुन काही गोष्टी पुढे आल्या. आपल्या भावनांचा मी आदर करतो. त्यामुळे विनम्रतापूर्व मी स्वत:ला या जाहिरातींपासून वेगळे करतोय. मी निर्णय घेतला आहे की, या जाहिरातीतून आलेले पैसे मी एखाद्या चांगल्या कामासाठी वापरेन. ब्रँडला वाटल्यास ते कराराचा अवधी पूर्ण होईपर्यंत ही जाहिरात प्रसिद्ध करु शकतात. मात्र मी वचन देतो की, भविष्यात कधीही मी मोठ्या विचारानिशी पर्याय निवडेन. मी सातत्याने तुमचे प्रेम आणि आशीर्वाद मागतच राहीन.’ अशा आशयाची पोस्ट करून अक्षय कुमारने चाहत्यांची माफी मागितली होती.