Take a fresh look at your lifestyle.

पंडित बिरजू महाराज यांच्या निधन वार्तेने हळहळले मोदी; बॉलिवूडकरांनीही वाहिली श्रद्धांजली

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याची बातमी आहे. दरम्यान ते ८३ वर्षाचे होते. रविवार आणि सोमवारच्या मध्यरात्रीस त्यांनी अखेरचा श्वास घेतला. याबाबत त्यांचा नातू स्वरांश मिश्राने सोशल मीडियावर माहिती दिली आहे. यानंतर संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीमधूनदेखील शोक व्यक्त केला जात आहे. इतकेच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शोक व्यक्त केला आहे. तसेच गायिका मालिनी अवस्थी आणि गायक अदनान सामी यांनीही सोशल मीडियाद्वारे पंडितजींना श्रद्धांजली वाहिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकृत ट्विटरच्या माध्यमातून पंडीतजींना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून केलेल्या ट्विटमध्ये लिहिले आहे कि, भारतीय नृत्य कलेला जगभरात एक अनोखी ओळख मिळवून देणारे पंडित बिरजू महाराज यांच्या निधनाने खूप दुःख झाले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण कलाविश्वाची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. या दु:खाच्या वेळी त्यांच्या कुटुंबीय आणि चाहत्यांशी माझ्या संवेदना आहेत. ओम शांती!

याशिवाय बॉलिवूड इंडस्ट्रीतील नावाजलेले गायक अदनान सामी यांनीही आपल्या ट्विटरच्या माध्यमातून पंडितजींना श्रद्धांजली वाहिली आहे. अदनान यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून केलेल्या ट्विटमध्ये लिहिले आहे कि, दिग्गज कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज यांच्या निधनाच्या बातमीने अत्यंत दु:ख झाले.
कलाक्षेत्रातील एक अतुलनीय व्यक्तिमत्व आपण गमावले आहे. त्यांनी आपल्या प्रतिभेने अनेक पिढ्यांना प्रभावित केले आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. अशाप्रकारे पंडितजींचे निधन जाळायची बातमी पसरताच संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.

बिरजू महाराज यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९३८ रोजी लखनौमध्ये झाला. त्यांचे मूळ नाव पंडित बृजमोहन मिश्रा आहे. ते एक उत्तम कथ्थक नर्तक आणि शास्त्रीय गायक होते. पंडितजींनी देवदास, देढ इश्किया, उमराव जान आणि बाजीराव मस्तानी यांसारख्या चित्रपटांसाठी नृत्यदिग्दर्शन केले आहे. शिवाय सत्यजित रे यांच्या ‘शतरंज के खिलाडी’ या चित्रपटाला त्यांनी बहारदार संगीत प्रदान केले होते. पंडितजींनी आपली कारकीर्द अशी गाजवली कि त्यांना १९८३ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. सोबतच त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि कालिदास सन्मानदेखील मिळाला आहे. शिवाय २०१२ साली त्यांना विश्वरूपम चित्रपटातील नृत्य नृत्यदिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर २०१६ साली बाजीराव मस्तानीच्या ‘मोहे रंग दो लाल’ या गाण्यातील नृत्यदिग्दर्शनासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.