हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करणाऱ्या या चित्रपटाच्या कथानकावर अनेकांनी आक्षेप घेतला, चित्रपटाचे प्रदर्शन रोखले, वाद- विवाद झाले. असे असूनही हा चित्रपट मात्र प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसतो आहे. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या चित्रपटाने यशाचा टप्पा गाठला असताना आता ‘केरला क्राईम फाईल्स’ सिरीजची एंट्री झाली आहे. या सीरिजच्या ट्रेलरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
‘द केरला स्टोरी’नंतर आता केरळवर आधारित आणखी एक गोष्ट वेब सीरिजच्या माध्यमातून समोर येणार आहे. ‘केरला क्राइम फाइल्स’ नावाची ही वेबसिरीज मूळ मल्याळम भाषेत असून डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर विविध भाषेत प्रदर्शित होणार आहे. ज्यामध्ये हिंदीचाही समावेश आहे. या सिरीजचा टीझर अलीकडेच प्रदर्शित झाला आहे. यामध्ये केरळमधील गुन्हेगारी विश्व, सेक्स वर्कर्सची होणारी हत्या आणि पोलीस तपास अशा विविध घटना दाखवल्या आहेत. हि सिरीज एक सस्पेन्स थ्रिलर ड्रामा असणार आहे.
या वेबसीरिज एका मर्डर मिस्ट्रीमागील रहस्याचा शोध घेते आहे. त्यामुळे हे कथानक या खुनाच्या तपासाभोवती फिरतेय. लाल आणि अजू वर्गीज हे कलाकार या सिरीजमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ही सस्पेंस, थ्रिलर आणि मर्डर मिस्ट्री वेब सिरीज कधी रिलीज होणार याबाबत अजून खुलासा झालेला नाही. पण हि सिरीज हिट होणार असे दिसत आहे. माहितीनुसार, ही वेबसीरिज मल्याळम भाषेसह तमिळ, तेलुगू, हिंदी, कन्नड, बंगाली आणि मराठी या भाषांमध्ये प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. त्यामुळे सिरीजचा प्रेक्षकवर्ग चांगला मोठा असणार आहे.
Discussion about this post