Take a fresh look at your lifestyle.

स्टँडअप कॉमेडियन नंतर आता ‘या’ मराठी अभिनेत्रीवर भडकले शिवभक्त

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. जोशुआने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील प्रस्तावित पुतळ्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींनी तिच्यावर कठोर शब्दांत टीका केली. त्यानंतर आता मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. मात्र या पोस्टमध्ये केतकीनेही महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने ती ट्रोल होत आहे.

‘शिवाजी, फक्त एवढे ऐकले की आम्ही उगाच पेटून उठणार. मजकूर आम्हाला तसाही कधी कळतच नाही, कारण तेवढी आमची बुद्धीमत्ता मुळातच नाही. मग ३ वर्षाच्या मुलाची बौद्धिक पातळी असलेले स्वघोषित मावळे, शिवाजी हा एक शब्द ओळखतात आणि महाराजांच्या शिकवणीला फाट्यावर मारून, महाराजांच्या नावावर राजकारण करायचा पोकळ विनोद सुरू करतात. बरं, अशा वागण्यानी आपण आपली लायकी दाखवून देतोय हे त्यांच्या लक्षात येत नाहीच. अर्थात हे कळण्यासाठीही नखाएवढी अक्कल लागतेच म्हणा! सोशल मिडीयावर ‘मराठी’ असा शब्द टाकून वाटेल तसा वणवा, काही लाईक्ससाठी पेटवणारे २० ते २५ वयोगटातील पोरे, ज्यांना खऱ्या आयुष्यात कुणी भाव अथवा नोकरी ही देणार नाही अशी कार्टी, या सर्कस चे रिंग मास्टर असतात.’ अशी पोस्ट तिने केली आहे.

पोस्टमध्ये तिने, ‘अरे मूर्खांनो, शालेय शिक्षण तरी घ्या! पण ते तरी कसे घेणार, कारण आमचे प्रेरणास्थान तर आर्ची (नाव ही मराठी नाही) आणि पर्शा! आम्ही फक्त भांडण करण्यासाठी महाराज, बाबासाहेब, फुले यांची नावे घेणार, त्यांनी लिहिलेल्या साहित्याचा अभ्यास कोण करणार!! सुधारणा करा बाळांनो, शिका.’ असे म्हंटले आहे. केतकीच्या या पोस्टनंतर तिच्यावरही जोरदार टीका केली जात आहे. तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.