Take a fresh look at your lifestyle.

‘अहमदनगर महाकरंडक’चा जल्लोष; सर्वोत्कृष्ट एकांकिकेसाठी हौशी रंगकर्मींमध्ये चुरस रंगणार

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ज्यांच्या नसानसांमध्ये नाटक असतं हौशी रंगकर्मींच्या कलाविष्काराला प्रोत्साहन देणारी आणि नाट्य कलाक्षेत्रातील नवोदित कलाकारांना त्यांच्या हक्काचं व्यासपीठ मिळवून देणारी महास्पर्धा आजपासून सुरु झाली आहे. महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी एकांकीका स्पर्धा अहमदनगर महाकरंडक २०२२ दिनांक २६ एप्रिल २०२२ म्हणजेच आजपासून सुरु झाली आहे. ‘उत्सव रंगभूमीचा, नवरसांचा’ची महाअंतिम फेरी अहमदनगर येथील माऊली सभागृहात दिनांक २६ एप्रिल २०२२ पासून दिनांक २९ एप्रिल २०२२ दरम्यान जल्लोषात रंगणार आहे.

अनुष्का मोशन पिक्चर्स अ‍ॅण्ड एंटरटेन्मेंट आणि शांती कुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन प्रायोजित, श्री महावीर प्रतिष्ठान आयोजित आणि झी- मराठीच्या सहयोगाने ‘अहमदनगर महाकरंडक २०२२’ जल्लोषात आजपासून सुरु होतोय. या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून प्राथमिक फेरीच्या माध्यामातून एकांकिकांची निवड करण्यात आली. दरम्यान या निवडीतून १२० एकांकिकांमधून तब्बल ३३ एकांकिकांची अंतिम फेरीत निवड झाली. यामध्ये पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, इस्लामपूर, जळगाव, धुळे, अमरावती आणि नागपूर या केंद्रांवरील प्राथमिक फेरीतील विजेते संघ अंतिम फेरीत दाखल झाले आहेत. यामध्ये २६ ते २८ एप्रिल २०२२ दरम्यान सकाळी १० ते रात्री १० आणि २९ एप्रिल २०२२ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत अंतिम फेरीतील एकांकिकांचे प्रयोग अहमदनगर येथील माऊली सभागृहात होणार आहेत.

दरम्यान २९ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ६.०० वाजता या स्पर्धेचा बक्षीस समारंभ पार पडेल. या सोहळ्यास मान्यवरांच्या उपस्थितीत जल्लोष होईल. अंतिम फेरीसाठी परीक्षक म्हणून सिनेइंडस्ट्रीतील नामांकित व्यक्तिमत्व उपस्थित राहणार आहेत. यामध्ये दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, अभिनेत्री आणि निर्माती श्वेता शिंदेसह अभिनेता आणि दिग्दर्शक अद्वैत दादरकर असणार आहेत. तसेच यावेळी मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित राहून स्पर्धकांचा उत्साह वाढवतील अशी आशा आहे. यावेळी अहमदनगर महाकरंडक समितीचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी आवाहन केले आहे कि, नाट्यप्रेमींनी कलेच्या या उत्सवात सहभागी होऊन उत्तम एकांकिकांचा आस्वाद घ्यावा.