Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रभाषेवर भिडले दोन प्रसिद्ध अभिनेते; तर सोशल मीडियावर मराठी भाषा ट्रेंडिंगमध्ये

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या सोशल मीडियावर भाषावाद अगदी जोरदार सुरु आहे. हा भाषा वाद काही साधा सुद्धा नाही बरं का.. तर हा वाद आहे राष्ट्रभाषेचा. बॉलिवूड इंडस्ट्रीचा सिंघम अर्थात अभिनेता अजय देवगण आणि कन्नड अभिनेता किच्चा सुदीप यांच्यामध्ये हे शाब्दिक युद्ध ट्विटरवर सुरु असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये अनेक युझर्सने सहभाग घेत मराठी भाषेची री ओढली आहे. इतकेच नव्हे तर एकीकडे हिंदी आणि दाक्षिणात्य भाषेवर अजय- किच्चाची चढाओढ सुरु असताना युजर्सने मराठी भाषेचा जयजयकार करीत त्या दोघांनाही खडे बोल सुनावणे पसंत केले आहे. या वादामध्ये ट्विटरवर ‘मराठी’ भाषा ट्रेडिंगमध्ये आली आहे. दरम्यान मुंबईत राहून हिंदी भाषेचा उदो उदो करणाऱ्या अजयवर युझर्स संतापल्याचेही दिसून येत आहे.

सोशल मीडियावरील वाद हा सर्वश्रुत होतो हे आपण सारेच जाणतो. त्यामुळे किच्चा आणि अजय यांचाही भाषावाद जगजाहीर झाला आणि ट्रोलिंगला एक कारणच मिळालं. अनेक युझर्स त्यांचा भाषा वाद पाहून संतापले आहेत. दरम्यान अनेकांनी दोघांनाही एकतेची भाषा समजवायचा प्रयत्न केलाय. अनेक युजर्स म्हणत आहेत कि, पुणे-मुंबईत खूप दाक्षिणात्य राहत आहेत. भारतीय एकात्मकतेला तडा जाईल असं काही करू नका. तर आणखी एकाने म्हटलं, मी मुंबईत आलोय. इथे मी हिंदी बोलतो. पण मराठी जास्त प्रभावी वाटतं. तर आणखी काहींनी लिहिले कि, तो सिनेमा हिंदी किंवा मराठीत डब झाला तर हिट होणार आहे का ? अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया देताना मराठी भाषेवरील प्रेम आणि निष्ठा दर्शवली आहे. या प्रतिक्रियांमध्ये मराठी सर्वोत्तम भाषा आहे असेही म्हटले जात आहे.

त्याच झालं असं कि, कन्नड सुपरस्टार किच्चा सुदीप याने एका सिनेमाच्या कार्यक्रमात हिंदी भाषा आणि हिंदी सिनेमांवरून वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तो म्हणाला होता की, ‘आता हिंदी ही राष्ट्रीय भाषा राहिलेली नाही. बॉलिवूडमध्ये तामिळ आणि तेलगू भाषांमधील सिनेमांचा रिमेक केला जातोय. परंतु त्यानंतरही बॉलिवूडचा स्ट्रगल अजूनही सुरूच आहे. आज आम्ही जे सिनेमे बनवतो तेच संपूर्ण जगामध्ये पाहिले जात आहेत.’

त्याच्या या विधानाला अजय देवगणने प्रत्युत्तर देत ट्विटमध्ये लिहिले कि, जर हिंदी राष्ट्रभाषा नसेल तर साऊथ इंडस्ट्रीतील निर्माते त्यांचे चित्रपट हिंदीत डब करून का रिलीज करतात? यानंतर मात्र ट्विटरवर दोन्ही अभिनेत्यांमध्ये भाषावाद सुरु झाला. पण त्यांनी आपापसांतील सामंजस्याने हा वाद वेळीच मिटविला आहे. पण तात्पुरता झालेलय या भाषा वादामुळे संतापलेल्या नेटकऱ्यांनी दोघांनाही ट्रोल करीत ‘मराठी’ भाषेचे पारडे किती उजवे आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे वाद कोणत्याही भाषेचा सुरु असला तरीही बोलबाला मराठी भाषेचा आहे.