Take a fresh look at your lifestyle.

‘धर्मवीर’मधला तो डायलॉग का काढला..?; अमेय खोपकरांनी उघड केली धक्कादायक ‘राज’ की बात

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या महाराष्ट्राचे राजकारण काही वेगळ्याच टोकावर पोहोचले आहे. मुख्य म्हणजे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह जवळपास ४० आमदारांनी आपल्याच सरकाराविरोधात बंड केले आहे. त्यामुळे राजकारण चालू आहे का पिच्चर तेच कळत नाही. या घडामोडी घडत असताना आता मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी अधिकृत सोशल मीडिया ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी ‘धर्मवीर’ चित्रपटातील एका सीनचे दोन व्हिडीओ शेअर केले आहेत. हे व्हिडीओ अतिशय धक्कादायक सत्य दाखवताना दिसत आहेत.

अमेय खोपकर यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून २ ट्विट केले आहेत. यामध्ये प्रवीण तरडे दिग्दर्शित आणि प्रसाद ओक अभिनित ‘धर्मवीर’ चित्रपटातील एका प्रसंगाचा उल्लेख आहे. या चित्रपटात आनंद दिघे रुग्णालयात असताना राज ठाकरे त्यांच्या भेटीला गेल्याचा एक प्रसंग दाखविला आहे. यावेळी संवादात जे डायलॉग्स आहेत ते दोन व्हिडिओत वेगवेगळे असल्याचा दाखला देत अमेय खोपकर यांनी शिवसेनेवर तोफ डागली आहे. त्यांनी या ट्विटमध्ये २ व्हिडीओ शेअर केले आहेत. यातील एक व्हिडीओ हा थिएटरमधील आहे तर दुसरा व्हिडीओ झी ५ वर प्रदर्शित झाल्यानंतरचा आहे.

या व्हिडीओत राज ठाकरे आनंद दिघेंना म्हणतात, ‘अहो धर्मवीर अजून हिंदुत्वाचं काम सर्वत्र पोहोचलेलं नाही. यावर दिघे म्हणतात, ‘ती जबाबदारी आता तुमच्या खांद्यावर आहे. हा थिएटर व्हिडीओ शेअर करत अमेय खोपकर म्हणाले, “खालील दोन्ही व्हिडीओ काळजीपूर्वक बघा. ‘धर्मवीर’जेव्हा zee5 वर येतो तेव्हा राजसाहेबांबद्दलचं वाक्य का गायब होतं? ही उद्धव ठाकरेंची सेन्सॉरशिप नाही तर दुसरं काय? राजसाहेबांच्या लोकप्रियतेला टरकणाऱ्या शिवसेनेचा खरा चेहरा उघड झालाय.’ याशिवाय अमेय खोपकर यांनी आणखी एक ट्विट केलंय. ही पोस्ट शेअर करत ‘धर्मवीर आनंद दिघे यांचा आवाज दाबणाऱ्या वृत्तीचा कडक शब्दात निषेध’, असे त्यांनी लिहिले आहे. या दोन्ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्या आहेत.