हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध मराठी आणि बॉलिवूड सिनेदिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा चित्रपट घोषणेपासूनच चर्चेत आहे. पण खरी चर्चा तर चित्रपटातील भूमिकांचे चेहरे समोर आल्यानंतर सुरु झाली. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारतो आहे.
यावरून बरंच ट्रोलिंग झालं. अनेकांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या. काहींनी तर अनेकदा छत्रपतींच्या भूमिकेत पसंतीस पडलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांचं नाव पुढे केलं. अशातच आता एका माध्यमाशी बोलताना कोल्हे याविषयी व्यक्त झाले आहेत.
एका माध्यमाने मुलाखत घेताना अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांना अक्षय कुमार शिवरायांच्या भूमिकेत असल्याबद्दल काही प्रश्न विचारले होते. याबाबत बोलताना कोल्हे म्हणाले कि, ‘गेली चौदा-पंधरा वर्षे मी अभिनय क्षेत्रात काम करतोय. बऱ्याच वेळा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करण्याचं भाग्य मला लाभलं. त्यामुळे एखाद्या अभिनेत्याला केवळ भूमिका महत्वाची असू शकते. तर, काहीजण त्याकडे ड्रीम रोल म्हणून बघू शकतात. माझ्यासाठी शारीरिक, मानसिक तयारी करून त्या भूमिकेला सामोरं जाणे गरजेच असते. त्यामध्ये नैतिक जबाबदारी आहे, हे मी स्वत: समजतो. इतर कोणी काय करावे, हे मोठ्या अभिनेत्याला सांगू शकत नाही.’
अभिनेता अमोल कोल्हे यांनी आतापर्यंत मालिका आणि चित्रपटांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे. त्यांनी साकारलेले शिवराय नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस पडले आहेत. कारण शिवरायांची गरिमा आणि त्यांच्या रुतब्याला जराही धक्का न लावता कोल्हेंची हि भूमिका जबाबदारीने निभावली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर या चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात झाल्याची माहिती दिली होती. तसेच त्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यक्तीरेखेतील व्हिडीओ देखील शेअर केला होता. जो पाहून काहींनी कौतुक तर काहींनी पुन्हा ट्रोलिंगवर जोर दिला आहे.
Discussion about this post