हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेते आणि राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे ‘शिवपुत्र संभाजी’ हे नाटक राज्यभरात गाजत आहे. अलीकडेच कराड येथे या नाटकाचा भव्य प्रयोग झाला. या प्रयोगादरम्यान अभिनेते अमोल कोल्हे यांचा अपघात झाला होता. यावेळी त्यांच्या पाठीला गंभीर दुखापत झाली होती आणि यामुळे त्यांचे चाहते चिंतेत पडले होते. आता त्यांच्या प्रकृतीसंदर्भात एक मोठी अपडेट आली असून त्यांनी स्वतःच सोशल मीडियावर पोस्ट शेयर करत याबाबत माहिती दिली आहे.
अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्या ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याचे संपूर्ण महाराष्ट्रात प्रयोग सुरू आहेत. औरंगाबाद, कोल्हापूरनंतर या नाटकाचा दौरा कराडमध्ये पोहोचला आणि या प्रयोगादरम्यान अमोल कोल्हे यांना गंभीर दुखापत झाली होती. कराडमध्ये २८ एप्रिल ते ३ मे पर्यंत दररोज सायंकाळी ६ वाजता ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याचे प्रयोग आयोजित करण्यात आले होते. यांपैकी गेल्या रविवारी ३० एप्रिल २०२३ रोजी पार पडलेल्या प्रयोगादरम्यान हा अपघात झाला.
सुरुवातीला सर्व काही सुरळीत पार पडले. मात्र अमोल कोल्हे यांची घोड्यावरून एन्ट्री होत असतानाच घोड्याचा पाय दुमडला गेला आणि यामुळे ते घोड्यावरून खाली कोसळले. या अपघातात त्यांच्या पाठीला जबर मार बसला. दरम्यान त्यांनी प्रथमोपचार घेत प्रयोग सुरू ठेवला आणि पूर्णदेखील केला’. मात्र याबाबत माहिती मिळताच चाहत्यांच्या जीवाची घालमेल झाली.
अमोल कोल्हे यांना घोड्यावरून पडल्याने झालेली दुखापत मोठी असल्याने त्यांना उपचार घ्यावे लागले. दिनांक १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचा प्रयोग करून अमोल कोल्हे रुग्णालयात दाखल झाले. यानंतर आता चाहत्यांसाठी त्यांनी रुग्णालयातूनच एक पोस्ट शेयर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी आपला रुग्णालयातील फोटो शेयर करत लिहिले आहे कि, ‘काळजी करण्यासारखे काही नाही. पुढे झेप घेण्यासाठी दोन पावलं मागे यावं लागतं! थोडीशी सक्तीची विश्रांती… परंतु दुखापत फार गंभीर नाही.. लवकरच भेटू ११ मे ते १६ मे हिंदुस्थान अँटिबायोटिक्स ग्राउंड, पिंपरी येथे *”शिवपुत्र संभाजी”* महानाट्य!!!’ हि पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अमोल कोल्हे यांचे चाहते त्यांना काळजी घेण्यास सांगत आहेत. तसेच त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत.
Discussion about this post