Take a fresh look at your lifestyle.

देवेंद्र फडणवीस बायकोसाठी डोसे बनवायचे..?; मिसेस फडणवीसांनी सांगितले बहारदार किस्से

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनी वरील किचन कल्लाकार हा असा शो आहे ज्यामध्ये विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी सहभागी होताना दिसतात. यामध्ये अगदी कलाकार, लेखक आणि राजकीय क्षेत्र संबंधित मंडळींचा समावेश आहे. या शो चे होस्टिंग संकर्षण कऱ्हाडे करतो तर महाराज म्हणून प्रशांत दामले अव्वल भूमिका बजावताना दिसतात. या शोमध्ये महाराष्ट्र राज्याचे पूर्व मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस सहभागी झाल्या आहेत. दरम्यान देवेंद्रजी देखील व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे सहभागी झाले. यावेळी अमृताजींनी असा काही किस्सा सांगितला कि सगळ्यांना आश्चर्य वाटलं. खवय्येगिरी करताना अमृता यांनी आपले गायन कौशल्य देखील सादर केले. या कार्यक्रमाचा पुढील भाग आज (गुरुवारी) रात्री ९.३० वाजता झी मराठीवर पाहता येणार आहे.

शो मध्ये सहभागी मिसेस फडणवीसांनी अनेक धमाल किस्से सांगितले त्यापैकी एक सगळ्यात भारी होता. देवेंद्रजी तुम्हाला कोणता पदार्थ उत्तम करता येतो, असा प्रश्न सूत्रसंचालक संकर्षण कऱ्हाडेने विचारला. त्यावर “मला चहा, डोसा, अंडा करी, ऑम्लेट, पोहे असे अनेक पदार्थ चांगले बनवता येतात” असं फडणवीस म्हणाले. त्यावर, तुम्हाला त्यांच्या हातचा कोणता पदार्थ आवडतो, असा प्रश्न संकर्षणने मिसेस फडणवीसांना विचारला. “त्यांच्या हातचा डोसा खूपच चांगला असतो, एकदम क्रिस्प डोसे बनवतात ते. त्यासोबत बटाट्याची भाजी आणि सांबारही छान बनवतात ते.” असं अमृता म्हणाल्या.

पुढे, इतक्यावरच न थांबता, “आधी दरवेळेस जेव्हा आमची बाई नाही यायची, तेव्हा देवेंद्रजींकडून मी आवर्जून डोसे बनवून घ्यायचे” असं उत्तर अमृता यांनी दिलं. त्यावर “मला एक सेकंद असं वाटलं, की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते होते आणि वहिनी आता म्हणाल्या की बाई यायची नाही तेव्हा त्यांच्या हातून मी करुन घ्यायचे. ही दोन किती वेगळीच वाक्य आहेत ऐकायला” असं संकर्षण म्हणाला. हे ऐकल्यानंतर सर्वत्र हशा पिकला. एकंदरच मिस्टर आणि मिसेस फडणवीस यांनी कार्यक्रमाला बहार आणला.

अमृता यांनी शोमध्ये कोंबडी वडा तयार केला आहे. तो बनविताना, या सिच्युएशनवर तुम्हाला कुठलं गाणं आठवतंय असा प्रश्न संकर्षणने विचारला आणि मला मात्र तुम्हाला पाहून ये नयन डरे डरे हे गाणं सुचतय असे तो म्हणाला. मग काय तेव्हा अमृता फडणवीस यांनी हजरजबाबीपणे मोगरा फुलला गाण्याच्या चालीवर कोंबडी वडा फुलला, कोंबडी वडा फुलला, वडा बनवताना घाम आता सुटला, असं गमतीदार गाणं गायलं. याशिवाय आणखी एका किस्स्यात अमृता यांनी एका बैठकीत देवेंद्रजी किती पुरणपोळ्या खाऊ शकतात? या प्रश्नावर ते ३०-३५ पुरणपोळ्या सहज पातेलंभर तूपासोबत खायचे, असं उत्तर दिलं. तर लग्नानंतर तुमची अपूर्ण राहिलेली इच्छा कोणती? असे विचारताच अमृता म्हणाल्या, त्यांना ३०-३५ पुरणपोळ्या खाताना पाहण्याची, त्याही मी न बनवलेल्या.