‘चंद्रमुखी’तील ‘बाई गं’ गाण्याविषयी व्यक्त झाली चंद्रा; म्हणाली, हे गाणं फक्त गाणं नसून..
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ या चित्रपटाची चहू बाजूने चर्चा आहे. दरम्यान या चित्रपटातील एकापेक्षा एक गाणी प्रेक्षकांना मोहून जाताना दिसत आहेत. आधी चंद्रा या गाण्याने प्रेक्षकांना थिरकायला भाग पाडलं. यानंतर आता आणखी एक गाणे प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. या गाण्याचे शीर्षक ‘बाई गं’ असे आहे. गाण्याचे बोल इतके निर्मळ आणि भावणारे आहेत कि निशब्द व्हायला होईल. इतकेच नव्हे तर, हे गाणं जिच्यावर चित्रित झालं आहे ती, म्हणजेच चंद्रा अर्थात सर्वांची लाडकी अभिनेत्री अमृता खानविलकर गाण्याविषयी व्यक्त झाली आहे. तिने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अमृताने हे गाणे सोशल मीडियावर शेअर करताना लिहिले कि, हे गाणं फक्त गाणं नसून …प्रेम आहे …भक्ती आहे … समर्पण आहे …. माझं अत्यंत आवडतं गाणं. गुरू ठाकूर यांनी शब्दबद्ध केलेल्या ‘बाई गं…’ या बैठकीच्या लावणीला अजय- अतुल यांनी संगीत दिले आहे. तर सुमधुर गायिका आर्या आंबेकरच्या आवाजाने या गाण्याची रंगत वाढवली आहे. या गाण्याच्या निमित्ताने आर्याने प्रथमच अजय- अतुलसोबत काम केले आहे. तर ‘लावणी किंग’ नृत्य दिग्दर्शक आशिष पाटील यांनी या लावणीचे नृत्य दिग्दर्शन केले आहे. ज्यामुळे अमृताच्या नृत्यशैलीसह तिच्या सौंदर्याने या गाण्यात चार चंद लावले आहेत.
प्रेक्षकांना मोहणाऱ्या या लावणीबद्दल चित्रपटाचे दिग्दर्शक प्रसाद ओक म्हणाले की, “बाई गं… ही एक बैठकीची लावणी असल्यामुळे ती कशी चित्रित करायची यावर आमच्या टीमसोबत चर्चा सुरू असताना, आमचे सिनेमॅटोग्राफर संजय मेमाणे यांनी या गाण्यासाठी अमृता काळ्या रंगाच्या नऊवारीवर हे सादरीकरण करणार आणि तिच्या खोलीतही अंधार असणार असं सांगितल्यावर सगळेच थोडे बुचकळ्यात पडलो. काही प्रमाणात चर्चा झाल्यानंतर काळी साडी आणि अंधारी खोली यावर आमचं एकमत झालं. संजय यांच्यावर विश्वास होताच, आणि तो पुन्हा एकदा सार्थ ठरला तो चित्रीकरणाच्या दिवशी…
पुढे म्हणाले कि, चंद्राचा संपूर्ण महाल समया, पणत्या, लामण दिव्यांनी सजवला. दिव्यांच्या लखलखाटात, अमृता जेव्हा काळी साडी नेसून आली तेव्हा सुमारे पावणे दोनशे लोकांचे युनिट तिच्याकडे एकटक बघत राहिले. तिच्यावर पडणारा तो दिव्यांचा प्रकाश तिचे सौंदर्य अधिकच तेजस्वी करत होते. सर्व युनिट त्यावेळी भारावून गेले होते. अमृताचं ते रूप आम्हा सगळ्यांच्या आजही डोळ्यांसमोर आहे आणि या सगळ्यामुळेच चित्रपटातील हे माझं सर्वात आवडतं गाणं आहे. प्रेक्षकांनाही हे गाणं नक्की आवडेल असा विश्वासही आहे.”