Take a fresh look at your lifestyle.

सोशल मीडियावर नेहरू- गांधी कुटुंबाची बदनामी; अभिनेत्री पायल रोहतगीवर पुण्यात गुन्हा दाखल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नेहमी वेगवेगळ्या कारणामुळे वादग्रस्त भूमिका वाढविणारी अभिनेत्री पायल रोहतगी आता पुन्हा एकदा कायदेशीर अडचणीत आली आहे. नेहरू-गांधी कुटुंबाविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह अशी कथित बदनामीकारक वक्तव्य करणारी व्हिडिओ पोस्ट केल्याबद्दल पायल रोहतगी विरोधात पुणे शहरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि तक्रार पुणे नगर काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात दाखल केली असून यावर कडक कारवाई करावी अशी विनंती करण्यात आली आहे. माहितीनुसार हा खटला दाखल झाल्यानंतर पायल रोहतगीला होईल त्या कारवाईस सामोरे जावे लागेल.

पुणे नगर काँग्रेस कमिटीद्वारे दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे कि, राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी व त्यांचे कुटुंबीय, काँग्रेस परिवार यांच्याविषयी खोटा बदनामीकारक व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर पायल रोहतगी हिने प्रसारित केला आहे. त्यातून हिंदू आणि मुस्लिम या दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

याबाबत पुणे शहर काँग्रेसचे प्रवक्ते रमेश अय्यर माध्यमांशी बोलताना म्हणाले कि, “पायल रोहतगी यांनी नेहरू-गांधी कुटुंबाबद्दल वारंवार अपमानास्पद टिप्पणी केल्या आहेत. अशीच एक अलीकडे केलेली पोस्ट आमच्या निदर्शनास आली आहे. पुढे, यामुळे रमेश बागवे, मोहन जोशी, दत्ता बहिरत, संगीता तिवारी, मी आणि पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी मिळून सायबर क्राइम सेलच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतली. दरम्यान या प्रकरणी औपचारिक तक्रार संगीता तिवारी यांनी दाखल केली होती. पोलिसांनी त्यावर त्वरित शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून घेतला आहे.

पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पायल रोहतगी विरोधात एफआयआर दाखल केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, पायल रोहतगीवर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली 153A सह जातीय विसंगतीला प्रोत्साहन देण्यासाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगायची बाब म्हणजे, अभिनेत्री पायल रोहतगीला जणू सवय लागली आहे कि एखादी आक्षेपार्ह पोस्ट किंवा वादग्रस्त विधान करायचे आणि अंगलट आल्यानंतर लगेच माफी मागून अंग काढून घ्यायचे. कारण याआधीही अश्याच कारणांमुळे अभिनेत्री पायल रोहतगीवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.