हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरात भोंग्याचा वाद चांगलाच उफाळल्याचे दिसून येत आहे. या दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या औरंगाबाद येथे जंगी सभा आयोजित करण्यात आली आहे. याकरिता शुक्रवारी राज ठाकरे पुणे येथे दाखल झाले होते आणि त्यानंतर आज सकाळी त्यांचा ताफा वेगाने औरंगाबादच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे. दरम्यान औरंगाबादला जात असताना त्यांच्या ताफ्यातील गाडयांना अपघात झाला आहे. या ताफ्यात ३० ते ४० गाड्या होत्या. या अपघातात अभिनेता अंकुश चौधरी आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या गाड्यांचा समावेश आहे. हि बातमी पसरताच सर्वत्र त्यांच्या चाहत्यांमध्ये काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अभिनेता अंकुश चौधरी आणि दिग्दर्शक केदार शिंदे हे राज ठाकरे यांच्या मनसे सैनिकांच्या ताफ्यातून पुणे येथून औरंगाबादकडे रवाना झाले होते. दरम्यान अहमदनगर येथील घोडेगावजवळ हा अपघात झाला आहे. यामध्ये साधारण ७ ते ८ गाड्या एकमेकांवर आढळल्यामुळे हा मोठा अपघात झाला. या गाड्या एकमेकांना एका मागून एक जाऊन धडकल्या आणि हा अपघात घडल्याचे समजत आहे. ज्यामध्ये अभिनेता अंकुश चौधरी आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या गाड्यांचे काहीशा प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती मिळतेय. अंकुश चौधरीच्या गाडीच्या बोनेटचे मोठे नुकसान झाले आहे. तूर्तास दिलास्याची बातमी अशी कि या अपघातात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. शिवाय आपण सुखरूप असून काळजीचे कारण नाही असे अंकुश चौधरीने माध्यमांना सांगितले आहे.
औरंगाबाद येथे राज ठाकरेंची जंगी सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे राज्याच्या कोपऱ्याकोपऱ्यातून मनसे सैनिकांच्या गाड्यांचा ताफा औरंगाबादकडे रवाना झाला आहे. दरम्यान सभेसाठी राज ठाकरे हजारों कार्यकर्त्यांसह पुण्याहून औरंगाबादकडे रवाना होत असताना रस्त्यात हा अपघात झाला. यावेळी राज ठाकरे यांची गाडी पुढे निघून गेली होती. बाकी राज्यभरातून मनसे कार्यकर्ते औरंगाबादकडे निघाले आहेत. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात मशिदी वरील भोंगे हटवण्याची मागणी राज ठाकरेंनी केल्यानंतर राज्यात या विषयामुळे खळबळ पहायला मिळाली. याच पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे उद्या औरंगाबाद येथे मोठी सभा घेत आहेत.