Take a fresh look at your lifestyle.

‘तेरी मेरी यारी, अगोदर मास्क घालू मग करू दुनियादारी’; अभिनेता अंकुश चौधरीच्या पोस्टची सोशल मीडियावर होतेय चर्चा

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण देशभरात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरते आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. यामुळे अनेकांचा नाहक बळी देखील गेला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. यामुळे लोकांनी कडक निर्बंधांचे पालन करणे आवश्यक आहे. याकरिता अभिनेता अंकुश चौधरीने त्याच्या अनोख्या अंदाजात आपल्या चाहत्यांना आवाहन केले आहे. अंकुश चौधरीने केलेली हि पोस्ट अतिशय चर्चेत आहे. नुसती चर्चेत नव्हे तर प्रचंड वेगाने वायरल देखील होतेय.

अभिनेता अंकुश चौधरी याने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये ‘तेरी मेरी यारी, अगोदर मास्क घालू मग करू दुनियादारी..मी जबाबदार’ असे लिहिलेले आहे. अंकुशच्या या पोस्टवर अनेक कमेंट्स येत आहे. या पोस्टवर अभिनेता स्वप्नील जोशीने देखील भन्नाट कमेंट केली आहे. त्याने म्हटले की दिग्या बोलला… म्हणजे बोलला..! तसेच चाहते देखील दुनियादारीचा डायलॉग्सवर यमक जुळवत कोरोनाचा मेसेज बनवताना दिसत आहेत. म्हणजेच काय तर अंकुशच्या हा हटके अंदाज त्याच्या चाहत्यांसह त्याच्या सहकलाकार मित्रांना देखील चांगलाच भावलेला आहे.

अभिनेता अंकुश चौधरी शेवटचा ‘धुराळा’ या मराठी चित्रपटात झळकला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव, अमेय वाघ हे कलाकार होते. त्यानंतर तो ‘लकडाऊन’ या चित्रपटात दिसणार आहे. त्याच्यासोबत या चित्रपटात अभिनेत्री प्राजक्ता माळी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती आहे. अंकुशच्या या आवाहनाला सोशल मीडियावर तरी भरभरून प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मात्र हा प्रतिसाद तेवढ्यापुरता मर्यादेत न राहता मूळ स्वरूपात देखील लोकांनी सत्यात अंगिकारायला हवा म्हणजे झालं.