Take a fresh look at your lifestyle.

‘अनुराधा’ वादाच्या भोवऱ्यात; महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकरांकडे पोस्टरबाबत तक्रार

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्लॅनेट मराठीची वेबसिरीज ‘अनुराधा’ हि सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकते का काय? अशी काहीशी चिन्हे दिसून येत आहेत. याचे कारण ठरलेय अनुराधा सीरिजचे पोस्टर. महत्वाचं म्हणजे, महाराष्ट्र महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याकडे या पोस्टरविषयी अनेकांकडून तक्रार करण्यात आली आहे असे त्यांनी ट्विट करून सांगितले आहे. या पोस्टरमध्ये महिलेचं ओंगळवाणं प्रदर्शन केलं आहे असं तक्रारकर्त्यानी म्हटल्याचेही चाकणकरांनी सांगितले. इतकेच नव्हे तर यावरून चाकणकरांनी संजय जाधवांवर थेट निशाणा साधत त्यांची कानउघाडणी केली आहे.

महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विट करीत लिहिले कि, एका वेबसिरीजच्या जाहिरातीसाठी महिलेच्या हातात सिगारेट देऊन तिचं ओंगळवाणं प्रदर्शन करत असल्याचे होर्डिंग्स फोटो समाजमाध्यमामधून फिरत आहेत आणि याबद्दल बऱ्याच तक्रारी माझ्यापर्यंत आल्या आहेत. यानंतर संजय जाधव यांना सुनावताना लिहिले कि, ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून या अशा जाहिरातीच्या माध्यमातून स्त्रियांचे ओंगळवाणे प्रदर्शन करणे आणि व्यसनाधीनतेसाठी समाज प्रोत्साहित होईल अशा गोष्टींवर अंकुश लागणे गरजेचं आहे.’

अनुराधा हि वेब सीरिज प्लॅनेट मराठी या OTT प्लॅटफॉर्मवर रिलिज झाली आहे. याच महिन्यातील १० डिसेंबरला ही सीरिज रिलिज झाली. ही वेब सीरिज एक प्रकारची मर्डर मिस्ट्री आहे. यामध्ये अनुराधा ही मध्यवर्ती भूमिका तेजस्विनी पंडित या मराठी अभिनेत्रीने साकारली आहे.

शिवाय या वेबसीरिजमध्ये सचित पाटील, सुकन्या कुलकर्णी, सुशांत शेलार, आस्ताद काळे, सोनाली खरे, विद्याधर जोशी, स्नेहलता वसईकर, संजय खापरे, वृषाली चव्हाण या कलाकारांच्याही मुख्य आणि महत्वाच्या भूमिका आहेत.