Take a fresh look at your lifestyle.

अर्जुन कपूरचा “सरदार का ग्रॅन्डसन’ हा आगामी चित्रपट होणार येत्या आठवड्यात प्रदर्शित

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर याचा आगामी चित्रपट ‘सरदार का ग्रॅंडसन’ हा येत्या आठवड्यात प्रदर्शित होणार आहे. दिनांक १८ मे २०२१ रोजी हा चित्रपट नेटफ्लिक्‍सवर सर्व प्रेक्षकांसाठी उपलब्ध होणार आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाचा ट्रेलरदेखील प्रदर्शित केला आहे. यामध्ये अर्जुन कपूर अमेरिकेतून परतलेला एक तरुण दिसतो आहे. सरदार अर्थात नीना गुप्ता ही एका शीख कुटुंबाची प्रमुख महिला असेल आणि अर्जुन तिच्या नातवाच्या भूमिकेत दिसणार आहे.

या सिनेमात अर्जुन आणि नीना गुप्ता व्यतिरिक्त रकुल प्रीत सिंग, आदिती राव हैदरी, जॉन अब्राहम, सोनी राजदान, कंवलजीत सिंह आणि कुमूद मिश्रा हे कलाकार देखील मुख्य भूमिकांमध्ये दिसणार आहेत. दिग्दर्शक काशिव नायर यांनी यापूर्वी निखिल अडवाणीसोबत ‘डी-डे’ साठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. त्यानंतर ‘पीओडब्लू-बंदी युद्ध के’ या टिव्ही सिरीयलचे सहदिग्दर्शक म्हणूनही त्यांनी काम पहिले होते. ‘सरदार का ग्रॅंडसन’ ही कथा आजीच्या पिढीची इच्छा नातवांनी पूर्ण करण्याची एक कौटुंबिक कथा आहे. या चित्रपटात कुटुंबातील नातेसंबंध आणि एकमेकांवर असणारे अपेक्षांचे नाते यावर भाष्य केले आहे. असा कौटुंबिक जिव्हाळा जपण्यास प्रवृत्त करणारा हा चित्रपट प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

सध्या बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर त्याच्या चित्रपटांपेक्षा किंवा त्याच्या अभिनयापेक्षा जास्त रिलेशनशिपमुळेच चर्चेत आहे. बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सोबत अर्जुनच्या असलेल्या नातेसंबंधांबाबत वारंवार विविध चर्चा उठत असतात. अनेकदा या दोघांवर त्यांच्या नात्याला घेऊन टीका केल्या जातात. मात्र अर्जुन आणि मलायका दोघेही ट्रोलिंगला न जुमानता बिंधास्त खुल्लेआम प्रेम करताना दिसतात. अनेकदा या दोघांना विविध ठिकाणी एकत्र स्पॉट केले आहे. तर मलायका अनेकदा अर्जुनसोबतचे फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर करीत असते.