‘तराफा’च्या माध्यमातून अश्विनी कासारचे रुपेरी पडद्यावर पदार्पण
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अनेक मराठी मालिकांच्या माध्यमातून आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री अश्विनी कासार आता रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज आहे. काही दिवसांपूर्वीच पोस्टर लाँच झालेल्या ‘तराफा’ या आगामी मराठी चित्रपटात अश्विनी कासार आपल्या अभिनयाने चार चांद लावण्यास पूर्णपणे तयार आहे. या चित्रपटातून ती पंकज खामकर यांच्यासोबत केमिस्ट्री बनविताना दिसेल. ही फ्रेश आणि नवीकोरी जोडी प्रेक्षकांना भावणार असा निर्मात्यांना पूर्ण विश्वास आहे. तराफा हा चित्रपट येत्या ६ मे २०२२ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
‘तराफा’ या आगामी मराठी चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये एक वेगळेच कुतूहल पाहायला मिळाले होते. ते म्हणजे या पोस्टरमधील छाया कोणाच्या आहेत. ते दोघे नक्की आहेत तरी कोण..? खरे या प्रश्नाचे उत्तर गवसले आहे. तराफा या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना अश्विनी कासार आणि पंकज खामकर हे दोघे पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. या जोडीची केमिस्ट्री अनुभवण्यासाठी रसिकांना केवळ ६ मे पर्यंतच प्रतीक्षा करावी लागणार आहे. निर्माता अविनाश कुडचे यांनी भूमी प्रोडक्शनच्या बॅनरखाली ‘तराफा’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर सुबोध पवार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे.
आपल्या चित्रपटाविषयी बोलताना सुबोध पवार यांनी सांगितले कि, अश्विनी कासार आणि पंकज खामकर हे दोन कलाकार ‘तराफा’च्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. यापूर्वी मालिकांमध्ये काम केल्यामुळे या दोघांनाही अभिनयाचा अनुभव आहे. चित्रपटातील काम मालिकांपेक्षा थोडं वेगळं असल्यामूळे ती कलाही आत्मसात करत दोघांनी आपापल्या व्यक्तिरेखा पूर्ण सजीव करण्याचा खरंच मनापासून प्रयत्न केला आहे. मुख्य म्हणजे ‘तराफा’च्या कथानकाला योग्य न्याय देण्यासाठी दोन नवीन चेहऱ्यांची गरज होतीच. यामूळे अश्विनी आणि पंकज यांची मुख्य भूमिकेसाठी निवड करण्यात आली आहे. पदार्पणातच दोघांनी अप्रतिम अभिनय केला असून, दोघांनी घेतलेल्या मेहनतीची जाणीव रसिकांना चित्रपट पाहिल्यावर नक्कीच होईल अशी आशा आम्हाला आहे.
अभिनेत्री अश्विनी कासार हिने अनेक मराठी मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. या मालिकांपैकी कमला हि तिची अत्यंत गाजलेली मालिका. या मालिकेने तिला विशेष ओळख मिळवून दिली. रिपोर्टनुसार सध्या अश्विनीचे २ सिनेमा प्रतीक्षेत आहेत. त्यापैकी एक म्हणजे ‘तराफा’ आणि दुसरा म्हणजे ‘एक होतं माळीण’ हा चित्रपटदेखील लवकरच प्रदर्शित होणार आहे.