Take a fresh look at your lifestyle.

‘अजूनही बरसात आहे’ मालिकेस प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद; रांगोळीच्या माध्यमातून चाहतीने केला प्रेमाचा वर्षाव

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अजूनही बरसात आहे’ हि नवीकोरी मालिका १२ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेतील उमेश कामत आणि मुक्त बर्वे अर्थात मीरा आणि आदिराज यांची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरते आहे. मीरा आणि आदी यांची ही प्रेमकथा रसिकांना अगदी काहीच क्षणात आवडू लागली आहे. मुंबई- पुणे- मुंबई, डबल सीट, जोगवा या अशा अनेक दर्जेदार चित्रपटांद्वारे, सहजसुंदर अभिनयाच्या जोरावर मुक्ताने प्रेक्षकांच्या मनामनांत आपली जागा निर्माण केली आहे. तर उमेश म्हणजे तरुणींच्या गळ्यातला ताईतच. टाईम प्लिज, लग्न पाहावे करून अशा अनेक चित्रपटांतून आणि मराठी नाटकांतून त्याने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. त्यात दीर्घ काळानंतर उमेश आणि मुक्ता यांची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि पुन्हा एकदा जादू करून गेली. प्रेक्षकांचे प्रेम इतके आहे कि एका चाहतीने तर चक्क रांगोळीच काढली आहे.

 

अनेको प्रेक्षक मालिकेचे अगदी भरभरून कौतुक करत आहेत. इतकेच नव्हे तर आदिराज आणि मीराच्या जोडीइतकेच इतर कलाकारांवरही भरभरून प्रेम करत आहेत. शिवाय रश्मी विसपुते नावाच्या एका चाहतीने तर स्वतःच्या घरात ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेची चक्क रांगोळीच काढली आहे. रश्मी मुळात नाशिकची असून मुक्ता आणि उमेश या दोघांची मोठी चाहती आहे. या रांगोळीला सोशल मीडियावर चांगली प्रसिद्धी मिळत आहे. मुक्ता आणि उमेशनेही रश्मीने काढलेली रांगोळी पाहून तिचे आभार व्यक्त केले आहेत.

मुक्ता आणि उमेश यांनी ‘लग्न पाहावे करून’ या चित्रपटात सोबत काम केले आहे. यानंतर तब्बल ८ वर्षांनी ही जोडी पुन्हा प्रेक्षकांना या मालिकेच्या निमित्ताने छोट्या पडद्यावर पाहायला मिळतेय. या मालिकेमध्ये राजन भिसे, उमा सरदेशपांडे, समिधा गुरू, सूचिता थत्ते, पल्लवी वैद्य, सचिन देशपांडे अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळत आहे. शिवाय मुक्ता आणि उमेशची पात्रे प्रेक्षकांना अत्यंत भावल्याचे दिसत आहे. मालिकेचा पहिला लुक प्रेक्षकांसमोर आला आणि प्रेक्षकांच्या मनात मालिकेबद्दलची उत्सुकता अत्यंत वाढली होती. मालिकेच्या आजपर्यंतच्या सगळ्या प्रोमोंना, पोस्टर्सना लाखोपेक्षा अधिकच व्ह्यूज मिळाले आहेत.