‘मुस्लिम देशात अजान ऐकायला मिळत नाही, मग हे फक्त भारतातच का होतं?’ – अनुराधा पौडवाल
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भक्तिमय गीते, भूपाळी, आनंद गीते गाऊन ज्यांनी सर्वाना मंत्रमुग्ध केले आहे अशा गायिका अनुराधा पौडवाल याना कोण ओळखत नाही. अगदी प्रत्येक पिढीतील व्यक्ती त्यांच्या आवाजाशी परिचित आहे. त्या नेहमीच आपल्या गायकीमुळे चर्चेत असतात. मात्र यावेळी त्यांनी केलेल्या काही वक्तव्यांमुळे त्या चर्चेत आहेत. सध्या राज्यात मशिदीवरील भोंगे आणि त्यावर वाजणारी अजान विरुद्ध हनुमान चालीसा असा वाद सुरु आहे. या विषयावर भाष्य करताना अनुराधा पौडवाल यांनी आपले मत मांडले आहे. मुस्लिम देशात जर स्पीकरवर अजान वाजवली जात नसेल तर भारतात हे असं का होतं? असा सवाल अनुराधा पौडवाल यांनी एका मुलाखतीत उपस्थित केला.
एका माध्यमाला मुलाखत देताना गायिका अनुराधा पौडवाल यांनी संबंधित विषयी आपले मत प्रकट केले आहे. यावेळी त्यांनी मुलाखतीत म्हटले की, ‘मी जगात अनेक ठिकाणी फिरले. पण आपल्या भारतात जे होतं, तसं घडताना मी इतर कुठेही पाहिलेलं नाही. मी कोणत्याही धर्माविरोधात नाही. मात्र आपल्याकडे जबरदस्तीने या गोष्टीला प्रोत्साहन दिलं जातंय. मशिदीवर लाऊडस्पीकर लावून अजान वाजवली जाते. त्यामुळे इतर धर्मियांनाही असं वाटतं की आम्हीसुद्धा असं का करू नये.
पुढे म्हणाल्या कि, मी आखाती देशांमध्ये प्रवास केला. तिथे लाऊडस्पीकरवर बंदी आहे. मुस्लीम देशात लाऊडस्पीकरवर अजान ऐकायला मिळत नाही. मग हे फक्त भारतातच का होतं? अजानप्रमाणेच देशातील इतरांनी लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवायला सुरुवात केली तर त्यातून वाद आणखी चिघळेल. हे सगळं पाहून दु:ख होतं. नवरात्री आणि रामनवमी या हिंदू सणांविषयी बोलताना अनुराधा पौडवाल म्हणाल्या कि, आपल्या मुलांना देशाच्या संस्कृतीबद्दल जागरूक केलं पाहिजे. आदि शंकराचार्य आपले धर्मगुरू आहेत, हे त्यांना माहित असायला हवं. हिंदूंकडे चार वेद, १८ पुराण आणि ४ मठ आहेत, याचीही माहिती त्यांनी असायला हवी.