Take a fresh look at your lifestyle.

सोनी मराठीच्या नव्या मालिकेत भाग्यश्री लिमये साकारणार खडूस बॉसची भूमिका

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मनोरंजन सृष्टीत जो थांबला तो संपला असं गणित पक्क असतं. त्यामुळे थांबायचं नाही गड्या म्हणत जो तो या रेसमध्ये टिकून राहण्यासाठी नेहमीच प्रयत्नांत असल्याचे दिसून येते. दरम्यान सोनी मराठी हि एक अशी मराठी वाहिनी आहे जी आघाडीच्या प्रगती पथावर आहे. या वर्षभरात नवीन विषय आणि नवीन कथानक असलेल्या बऱ्याच मालिका घेऊन हि वाहिनी प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. यानंतर आता लवकरच या वाहिनीवर ‘बॉस माझी लाडाची’ ही नवीन मालिका सुरू होत आहे. ज्यामध्ये अभिनेत्री भाग्यश्री लिमये पहिल्यांदाच एक खडूस भूमिका करताना दिसणार आहे.

सोनी मराठीवर सुरु होणाऱ्या ‘बॉस माझी लाडाची’ या मालिकेमध्ये अभिनेत्री भाग्यश्री लिमये आणि अभिनेता आयुष संजीव ही नवीकोरी भन्नाट जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तब्बल दोन वर्षानंतर भाग्यश्री लिमये या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर दिसणार आहे. इतकेच काय तर या मालिकेत ती खडूस बॉसच्या भूमिकेत दिसणार आहे. पण हि खडूस बॉस ऑफिसमध्ये आणि घरामध्ये आदर्श सून म्हणून दिसणार आहे. होय या मालिकेचे कथानक कौटुंबिक असल्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत या मालिकेची मजा घेऊ शकाल.

‘बॉस माझी लाडाची’ या मालिकेमध्ये अभिनेत्री भाग्यश्री लिमये, अभिनेता आयुष संजीव यांच्यासह ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, अभिनेता गिरीज ओक, माधवी जुवेकर अशी तगडी स्टार कास्ट आहे. त्यामुळे हि संपूर्ण मालिका बघताना प्रेक्षकांनाही भरपूर मजा आणि मनोरंजनाचा आस्वाद घेता येईल. आता वर्क फ्रन्टबद्दल बोलायचं तर, अभिनेत्री भाग्यश्री लिमये ही एक लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे, तिचे मूळ गाव सोलापूर असून ती सध्या मुंबईत राहते. भाग्यश्रीने सिम्बायोसिस पुणे येथून कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. यानंतर तिने २०१४ साली महाराष्ट्र टाइम्सचा श्रावण क्वीन क्राऊन जिंकला. यानंतर कलर्स मराठीवरील ‘घाडगे आणि सून’ या मालिकेतून तिचे टीव्ही डेब्यू झाले. या शोमध्ये तिची जोडी अभिनेता चिन्मय उदगीरकरसोबत होती.