Take a fresh look at your lifestyle.

जगायचंय, फक्त या भावना अनुभवण्यासाठी; भाग्यश्री लिमयेची भावनिक पोस्ट

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री भाग्यश्री लिमयेचे वडील माधव लिमये यांचे नुकतेच काही दिवसांपूर्वी निधन झाले आहे. भाग्यश्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर बाबांसोबतचा फोटो शेअर करीत याची माहिती दिली होती. फोटोसोबत ‘रेस्ट इन पीस बाबा’ असे कॅप्शनही तिने दिले होते. बाबांच्या निधनानंतर भाग्यश्री पुरती कोलमडून गेलीये. नुकतेच तिने इंस्टाग्रामवर या कठीण काळात तिला कोणकोणत्या प्रसंगांतून जावे लागले आणि तिने काय अनुभवले हे सांगितले आहे. तिची हि भावनिक पोस्ट वाचून चाहत्यांसह अनेक मराठी कलाकार देखील हळहळले आहेत.

भाग्यश्रीने इंस्टाग्रामवर लिहिले की, हा काळ कठीण आहे. आपल्या सगळ्यांसाठीच. मी यात एकटी नाही. माझे बाबा कोरोना ने गेले. इतक्या झटक्यात ही घटना घडली की आपल्या हातात खरंच काही नाही या सत्याची अनुभूती पुन्हा एकदा झटका देऊन गेली. माझ्या कोणत्या ही विश्वासावरचा माझाच विश्वास उडाला. कोणत्याच गोष्टीत तथ्य नाही हे उमजलं. काहीच आपल्या हातात नाही तर मग जगण्यात काय अर्थ असा विचार डोक्यात येणं स्वाभाविकच. इथे बाबा आय.सी.यु. मध्ये असताना, त्यांचं जाणं निश्चित आहे हे माहीत असताना, आपण केलेले कोणतेही प्लॅन्स किती एकतर्फी असतात हे दिसताना, पलीकडच्या वॉर्ड मध्ये नवीन जन्म होत असताना मी पाहायचे. वाटायचं, काय उपयोग या जगात येऊन.

उद्या तुम्हाला ही ‘ आयुष्य ‘ या नावाच्या मायाजळातून जावं लागणार आहे. स्वतःची प्रीय व्यक्ती गमवावी लागणार आहे. आयुष्य या कॉन्सेप्ट चा राग आला होता मला. आपल्या या अख्ख्या प्रवासात आपला स्वतःचा साधा खारीचा ही वाटा नाही, हे असलं आयुष्य का कुरवाळत बसायचं? सगळ्या आशा अपेक्षा नाहीश्या होणं म्हणजे काय हे खऱ्या अर्थाने कळलं. शेवटच्या दोन दिवसात बाबांची टेस्ट निगेटिव्ह आली आणि त्यांना कोव्हीड आय.सी.यु. मधून मेडिकल आय.सी.यु. मध्ये शिफ्ट करण्यात आलं. त्यांनी ही लढाई जिंकली असा समज माझ्या घरच्यांचा झाला. पण पोस्ट कोव्हीड इफेक्ट्सने बाबांची तब्येत सुधारणार नाही आणि काहीच क्षण बाबा माझ्या बरोबर असणार आहेत याची कल्पना फक्त मलाच होती.

२० दिवसांनी मी पहिल्यांदा बाबांना इतक्या जवळून पाहिलं. रोखलेले आश्रु खुपत होते. त्यांना ही आणि मलाही. आम्ही एकमेकांचे हात हातात घेऊन फक्त एकमेकांकडे बघत राहिलो. कदाचित काय घडणार आहे हे पहिल्यांदाच निश्चित माहीत असणारे आम्ही दोघे ही एकमेकांसमोर आलो होतो. दोघांनाही एकमेकांना सत्याची जाणीव नव्हती करून द्यायची.आयुष्याचं रहस्य, त्यातलं सत्य हे कळणं अशक्य आहे पण तो स्पर्श, या जगात माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या माझ्या बाबांचा स्पर्श मात्र खरा जाणवला. या खोट्या जगात, फक्त भावना याच खऱ्या. या भावना मनात घर करतात हेच खरं. जगायचंय, फक्त या भावना अनुभवण्यासाठी. हेच सत्य आहे. बाकी काही नाही.