Take a fresh look at your lifestyle.

बिग बॉसचा बिग निर्णय; लज्जास्पद वागणुकीसाठी ‘या’ सदस्यांना दिली नॉमिनेशनची सजा

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीच्या घरात सध्या टास्क जिंकण्यासाठी जो तो चुरशीने लढताना दिसत आहेत. दरम्यान या आठवड्यात कॅप्टन्सीच्या उमेदवारीसाठी साप्ताहिक कार्य सोपविण्यात आले होते. ‘चल रे भोपळ्या टुणूक टुणूक’ असे या कॅप्टन्सी कार्याचे नाव होते. नावाप्रमाणे टास्क देखील भन्नाट होता मात्र या दरम्यान घरामध्ये काल बरेच राडे बघायला मिळाले. घरातील सदस्यांनी बिग बॉसच्या नियमांची पायमल्ली करीत टास्कचा विचका केला. यामुळे संतप्त बिग बॉस यांनी सदस्यांची कडक शब्दात निंदा केली. इतकेच नव्हे तर विशाल, गायत्री आणि स्नेहा यांना त्याचे परिणाम देखील भोगावे लागले. कुठलेही कार्य पार पाडताना वेगवेगळया युक्त्या वापरणे योग्यच असते. पण, ते पार पाडत असताना धक्काबुक्की होणे, कुठल्याही सदस्याला शारीरिक इजा होणे अतिशय निंदनीय आहे, अश्या कडक शब्दात कानउघाडणी करीत बिग बॉस यांनी जय, उत्कर्ष, विकास आणि आदिशला सक्त ताकीद दिली.

या दरम्यान स्पर्धक विशाल निकमने काल बिग बॉसच्या घरातील प्रॉपर्टिचे नुकसान केले. घरातील प्रॉपर्टिचे नुकसान ही अक्षम्य चूक असल्याने विशालला बिग बॉस यांनी शिक्षा देत थेट पुढील आठवड्यातील घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट केले. परंतु ही ताकीद दिल्यानंतरदेखील काही सदस्यांकडून नियमांच्या चिंध्या करण्यात आल्या. खरतर या घरातील प्रत्येक टास्क हा युक्तीने आणि खिलाडूवृत्तीने खेळायचा असतो. पण या सिजनमध्ये असे काही होताना दिसत नाही. राग, द्वेष, आक्रमकता आणि धक्काबुक्की याशिवाय कार्य होतच नाहीत. त्यामुळे ही वागणूक लज्जास्पद आहे असे म्हणत बिग बॉस यांनी घरातील सर्व सदस्यांचा तीव्र शब्दात निषेध केला आणि यासोबत हे साप्ताहिक कार्य रद्दच केले.

टास्कदरम्यान गायत्री आणि स्नेहा आपल्या रागावरचे नियंत्रण गमावून बसल्या. टास्कमध्ये आक्रमक होऊन त्यांनी जी कृत्ये केली त्यामुळे सदस्यांना शारीरिक इजा होऊ शकत होती. यामुळे बिग बॉसने त्या दोघींनादेखील पुढील आठवड्यातील घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट केले. यानंतर आज बिग बॉस मराठीच्या घरात बरंच काही पाहायला मिळणार आहे. परंतु उत्सुकता याची आहे कि, एवढ्या राड्यानंतर आता घरामध्ये नवा कॅप्टन कोण बनणार? कारण, कालच्या भागामध्ये दाखविल्याप्रामाणे आज एका कार्याद्वारे घरातला कॅप्टन कोण होणार हे आपल्याला समजणार आहे. यासाठी कलर्स मराठीवर आपला मराठी बिग बॉस जरूर पहा.