Take a fresh look at your lifestyle.

NCB च्या पंचनाम्यात मोठा खुलासा; आर्यन खानकडून ड्रग सेवनाचा कबुलीनामा

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मुंबई – क्रूझ ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासह अन्य आरोपींना तब्बल १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर यांची रवानगी सध्या आर्थर रोड कारागृहात करण्यात आली आहे. दरम्यान अटकेत असलेल्या आर्यन खानने ड्रग्स घेतलं होतं की नाही? असा मोठा प्रश्न होता. यानंतर आता मोठी बातमी समोर येत आहे. NCB’च्या म्हणण्यानुसार, आर्यन खानने अधिकाऱ्यांसमोर कबूल केले आहे की, त्याने चरसचे सेवन केले होते. त्याचा मित्र अरबाज मर्चंट त्याच्या शूजमध्ये ६ ग्रॅम चरस लपवून क्रूझवर गेला होता. कारण त्यांना क्रूझवर मनाजोगती धमाकेदार पार्टी करायची होती.

मुंबईच्या समुद्रात २ ऑक्टोबर २०२१ रोजी NCB ने ‘कॉर्डेलिया’ लक्झरी क्रूजवर छापा टाकला आणि संपूर्ण पार्टी उधळून लावली. या पार्टीचा संबंध बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणाशी लागताच NCB ने तपासात वेग वाढवला आणि अटकेत असलेल्या प्रत्येकाची कसून चौकशी सुरु केली. क्रूझमध्ये छापा मारल्यानंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा अरबाज खानला विचारले की, त्याच्याकडे काही ड्रग्ज आहेत का, तेव्हा त्याने सांगितले की त्याने त्याच्या शूजमध्ये ड्रग्स लपवलेले आहेत. यानंतर, NCB ने विचारणा केल्यामुळे अरबाज मर्चंटने स्वतः त्याच्या शूजमधून चरस असलेले झिप लॉक पाउच काढले. इतकेच नव्हे तर त्याने सांगितले कि, तो आर्यन खानसोबत चरस घेतो आणि ते चरस क्रूझवर पार्टीत ओढण्यासाठीच आणले होते. यानंतर जेव्हा अधिकाऱ्यांनी आर्यन खानला विचारले, तेव्हा त्यानेही कबूल केले की त्याने चरसचे सेवन केले आणि हे चरस क्रूझ ट्रिपमध्ये धूम्रपान करण्यासाठी घेतले जात होते.

एनसीबीच्या पंचनाम्यात म्हटल्याप्रमाणे, अरबाज मर्चंटने NCB अधिकाऱ्यांना सांगितले की, त्याच्या शूजमध्ये चरस आहे. यानंतर अरबाजने स्वेच्छेने त्याच्या शूजमध्ये ठेवलेले झिप लॉक पाउच काढले. या झिप लॉकच्या आत एक काळा चिकट पदार्थ होता. जेव्हा डीडी किटसह त्याची चाचणी केली तेव्हा तो पदार्थ चरस असल्याचे समोर आले. अरबाजने कबूल केले की, तो आर्यनसोबत चरस घेतो आणि ते या क्रूझ ट्रिपमध्ये मज्जामस्ती करणार होते. पंचनाम्यानुसार, आर्यन खानला प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्याने कबूल केले की, तो चरस देखील ओढतो आणि हे चरस क्रूझवर प्रवास करताना ओढण्यासाठी वापरणार होते. या चरसचे वजन 6 ग्रॅम होते. लक्झरी क्रूझ कॉर्डेलियावरील छाप्याचे हे तपशील एनसीबीच्या पंचनामावर आधारित आहेत, याची नोंद घ्यावी.