Take a fresh look at your lifestyle.

सांगलीचा सुपुत्र विशाल निकमच्या BB विजयाचा देविखिंडीत जल्लोष; गुलाल उधळीत गावकऱ्यांनी केले स्वागत

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठी वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय आणि प्रचंड गाजलेला रिऍलिटी शो ‘बिग बॉस मराठी ३ चे विजेतेपद विशाल निकमने पटकावले आणि यानंतर विशालच्या गावात मोठा जल्लोष साजरा होताना दिसत आहे. कायमस्वरूपी दुष्काळी भाग म्हणून ओळख असणार्‍या खानापूर तालुक्यातील देविखिंडी गावची ओळख विशाल निकमच्या या यशामुळे आता सातासमुद्रापार गेले आहे. विशाल निकम हा बिग बॉस मराठी 3 चा विजेता ठरल्याचे जाहीर होताच त्याच्या चाहत्यांनी आणि गावकर्‍यांनी, युवकांनी एकत्र येत गावात गाण्याच्या ठेक्यावर ताल धरत गुलालाची मुक्त उधळण करत जल्लोष साजरा केला.

’बिग बॉस’च्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या विशालला खरी ओळख ’दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेमुळे मिळाली. या मालिकेत त्याने ज्योतिबाची भूमिका साकारली होती. त्याचसोबत त्याने ’धुमस’, ’मिथून’, ’साता जल्माच्या गाठी’ यांसारख्या काही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. विशालचा जन्म 10 फेब्रुवारी 1994 रोजी सांगली जिल्ह्यातील देविखिंडी येथे झाला. विशालला अभिनयासोबतच फिटनेसची देखील आवड आहे. विशालने त्याच्या करिअरची सुरुवात मिथुन या सिनेमाद्वारे केली. हा सिनेमा 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्या सिनेमामध्ये त्याने मुख्य भूमिका साकारली होती.

यानंतर विशालनं धुमस या मराठी सिनेमातही काम केलं. परंतु विशालला लोकप्रियता मिळाली ती दख्खनचा राजा ज्योतिबा आणि जय भवानी जय शिवाजी या टीव्ही मालिकांमुळं. आज दुपारी विशाल निकम याचे घरी आगमन होताच गावकर्‍यांनी, युवकांनी आणि मित्र परिवाराने एकच जल्लोष करत आपल्या लाडक्या विशालला खांद्यावर घेत संपूर्ण गावातून जोरदार घोषणाबाजी करीत मिरवणूक काढून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.