Take a fresh look at your lifestyle.

पक्षपाती केजो; बिग बॉस ओटीटीच्या स्पर्धकांचा करण जोहरवर गंभीर आरोप

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील अत्यंत लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रिऍलिटी शो ‘बिग बॉस’चा १५वा सीजन दणक्यात सुरु झाला आणि आता प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतानाही दिसतोय. अलग ढंगात सुरु झालेला बिग बॉस ओटीटी एका वेगळ्या यशाच्या शिखरावर पोहचत असताना या पर्वातील काही स्पर्धक काहीसे नाराज झाल्याचे दिसत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणाऱ्या बिग बॉस ओटीटीचं होस्टींग करणारा चित्रपट दिग्दर्शक करण जोहर पक्षपात करतो असे म्हणत काही स्पर्धकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

 

शोच्या फॉरमॅटनुसार प्रत्येक ‘संडे का वार’ या स्पेशल एपिसोडमध्ये करण जोहर स्पर्धकांशी आठवड्या भरात घडलेल्या घटनांचा लेखाजोखा मांडताना दिसतोय. गेल्या दोन रविवारी ‘संडे का वार’ या एपिसोडमध्ये करणने जवळ जवळ सगळ्याच स्पर्धकांची खरडपट्टी केजो स्टाईलने काढली होती. पण या आठवड्यात मात्र करण जोहरच्या होस्टिंगवरच प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. इतकंच काय तर, करण पक्षपात करत असल्याचा आरोप बिग बॉसमधील स्पर्धक मिलिंद गाबा आणि जीशान खान यांनी लावला आहे. या दोघांनी आपसांतील संभाषणादरम्यान एक वक्तव्य केलं की, करण ‘संडे का वार’ एपिसोड दरम्यान कोणत्याही मुलाशी बोलत नाही.

शोमधील स्पर्धक जीशान खान प्रतिस्पर्धक अक्षरा सिंहला म्हणाला होता, की तू मुलगी आहे तर तुझ्या हद्दित राहा. या वक्तव्यावर कमेंट करताना ‘संडे का वार’ या एपिसोडमध्ये होस्ट करण जोहरने जीशानला उभे आडवे करीत चांगलेच खडेबोल सुनावले. या तापलेल्या एपिसोडनंतर करण जोहर रागवल्यावर सोमवारी मिलिंद गाबा आणि जीशान खान हे एकमेकांसोबत संवाद साधत होते. या दरम्यान स्पर्धक मिलिंद म्हणाला, ” तू एका महिलेबद्दल वक्तव्य केलं आहेस. म्हणून, करणने प्रत्येक महिला स्पर्धकाला याबद्दल मत विचारले. पण कोणत्याही मुलाला त्याने यावर काहीच प्रश्न विचारला नाही. करण फक्त शमिता शेट्टीला बोलण्याचीच परवानगी देतात. असे म्हणताना या संवादा दरम्यान दोघांनी करणवर थेट पक्षपाताचा आरोप लावला आहे.