Take a fresh look at your lifestyle.

ठाण्याच्या ढाण्या वाघाचा आशियात डंका! 16,800 स्क्वेअर फुटाच्या होर्डिंगवर ‘धर्मवीर’ विराजमान

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट १३ मे २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला. शनिवारी दिनांक ७ मे २०२२ रोजी वांद्रे येथील ताज लँड्स एंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये हा ट्रेलर लॉंच सोहळा पार पडला.

दरम्यान शिवसेना पक्ष प्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊत, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. इतकेच नव्हे तर बॉलिवूड इंडस्ट्रीचा भाईजान सलमान खान देखील याठिकाणी उपस्थित होता. इतकेच काय तर आता या चित्रपटाचे होर्डिंग जगातील सर्वात मोठे होर्डिंग म्हणून जाहीर झाले आहे. त्यामुळे आता आशियात एकच डंका तो म्हणजे ‘धर्मवीर’ यांचा.

महाराष्ट्रातील विविध ठिकाणी या चित्रपटाचे ३० फुटी कट आऊट्स लावण्यात आले आहेत. हे कटआउट्स तर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत यात काहीच शंका नाही. पण आता या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आजवर मराठी चित्रपटसृष्टीत जे घडलं नाही ते घडवून आणलं आहे. चित्रपटाच्या प्रसिद्धी किंवा जाहिरात तंत्रात कधीच न घडलेली हि घटना सर्वांसाठीच अभिमानाची बाब ठरतेय. मुंबईतील वांद्रे येथे पश्चिम द्रुतगती मार्गावर आशियातील सर्वात मोठ्या आकाराचे १६, ८०० स्क्वेअर फुटाचे भव्य असे होर्डिंग आहे.

या होर्डिंगवर आजवर एकाही मराठी चित्रपटाचे पोस्टर झळकले नव्हते. मात्र आता ‘धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाचे भव्य दिव्य पोस्टर यावर झळकताना दिसते आहे. दिघेंच्या भूमिकेतील प्रसाद ओकचा करारी बाणा या पोस्टरकडे या भागातून जाणा-या लाखो वाहनधारकांचे तथा परिसरातील रहिवाश्यांचे लक्ष वेधून घेत आहे. सध्या सर्वत्र याच होर्डिंगची चर्चा आहे.

सर्वसामान्यांसाठी आयुष्य खर्ची करणाऱ्या व्यक्तिमत्वाची नव्याने आगामी पिढीला ओळख करून देणे असा ध्यास उराशी बाळगून प्रवीण तरडे यांनी धर्मवीर या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट बाळासाहेब ठाकरे यांचे शिष्य आणि ठाण्याचा ढाण्या वाघ अशी ओळख असलेल्या धर्मवीर आनंदराव दिघे यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक याने आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे. चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये जेव्हा प्रसाद आनंद दिघेंच्या भूमिकेत समोर आला तेव्हापासूनच हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. त्यामुळे आता प्रतीक्षा आहे ती फक्त आणि फक्त १३ मे’ची.