Take a fresh look at your lifestyle.

‘चौदवीं का चांद’ फेम अभिनेत्री मीनू मुमताज यांचे निधन; वयाच्या 79’व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार बॉलिवूड इंडस्ट्रीवर पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे. ब्लॅक अँड व्हाईट एरातील ५०-६०च्या काळात बॉलिवूड चित्रपटसृष्टीवर आपल्या सौंदर्याची छाप पाडणाऱ्या दिग्गज अभिनेत्री मीनू मुमताज यांचे आज २३ ऑक्टोबर २०२१ रोजी निधन झाले आहे. वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला असून दरम्यान त्या कॅनडामध्ये होत्या. मुमताज यांच्या भावाने त्यांच्या निधनाच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. त्यांच्या भावाचे नाव अनवर अली असे आहे.

मीनू मुमताज यांचा भाऊ अनवर अली यांनी त्यांच्या निधनाची बातमी दिली आहे. यासह सिनेइंडस्ट्री, मीडिया आणि त्यांच्या चाहत्यांनी त्यांना दिलेल्या प्रेमाबद्दल आभार देखील मानले आहेत. मीनू मुमताज या बॉलिवूडमधील प्रसिद्ध विनोदवीर महमूद अली यांच्या बहिण आहेत. मुमताज यांनी अनेक हिंदी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. साधारण १९५० – १९६० च्या दशकात त्यांनी ब्लॅक अँड व्हाईट एरादरम्यान संपूर्ण बॉलिवूड चित्रपटसृष्टीवर राज्य केले आहे. या काळात त्यांनी आपले सौंदर्य, बोलका अभिनय आणि उत्तम नृत्य शैलीच्या बळावर भल्याभल्यांना वेड लावले होते.

मुमताज या फक्त एक अभिनेत्री नव्हत्या तर त्या एक प्रसिद्ध नृत्यांगनादेखील होत्या. मीनू मुमताज यांनी आपल्या करियरची सुरूवात डान्सर म्हणून केली होती. त्यानंतर पन्नासच्या दशकात त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये डान्सर म्हणून काम केले. ‘सखी हातिम’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात त्या बलराज सहानीसोबत मुख्य भूमिकेत दिसल्या होत्या. मीनू मुमताज यांनी गुरु दत्त यांच्या अनेक चित्रपटांमध्ये विविध महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. मुमताज यांनी ‘वे कागज का फूल’, ‘चौदवीं का चांद’, ‘साहिब बीवी और गुलाम’, ‘ताजमहल’, ‘घूंघट’, ‘इंसान जाग उठा’, ‘घर बसाके देखो’, ‘गजल’ यासारख्या चित्रपटात त्यांनी काम केले आहे.