Take a fresh look at your lifestyle.

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम आणि पत्नी प्रिया दोघांनाही कोरोनाची लागण; इंस्टावर दिली माहिती

0

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। सध्या जगभरात पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घालण्यास सुरुवात केली असल्याचे दिसून येत आहे. राज्यभरात कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढू लागली आहे. परिणामी तिसऱ्या लाटेचा धोका अधिक जाणवत आहे. तर अनेकांनी फेब्रुवारीमध्ये तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याचे सांगितले आहे. दरम्यान कोरोनाने राजकीय क्षेत्राबरोबर बॉलिवूड क्षेत्रातही पुन्हा एकदा हातपाय पसरले आहेत. त्यात बॉलिवूडकरांच्या पार्ट्या कोविद स्प्रेडर ठरत आहेत. यामुळे कोरोनाचा वाढता संसर्ग पाहून नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियम पाळण्याचे आवाहन राज्य सरकारकडून केले आहे. या दरम्यान आता अभिनेता जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी प्रिया या दोघांचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

अभिनेता जॉन अब्राहाम याने आपल्या सोशल मीडिया इंस्टाग्रामवर याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे. इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करून जॉनने लिहिले कि, मला कोरोनाची लागण झाली असून रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझ्यासह पत्नीसुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आहे. तीन दिवसांपूर्वी मी एका व्यक्तीच्या संपर्कात आलो होतो. नंतर त्या संबंधित व्यक्तीला कोरोना झाल्याचे समजले. यानंतर आम्ही चाचणी केली आणि त्यात आम्हा दोघांचीही टेस्ट पॉझिटिव्ह आली. आम्ही सध्या घरीच क्वारंटाइन असून कोणाच्याही संपर्कात नाही. दोघांनीही लस घेतली होती, सध्या सौम्य लक्षणे आहेत. पण काळजी करण्याचं कारण नाही.’ तुम्हीही काळजी घ्या आणि मास्क घाला. तूर्तास दोघांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली आहेत. त्यामुळे जॉनने आपल्या चाहत्यांचा काळजी करू नये असे आवाहन केले आहे.

याआधी गेल्या २ वर्षात असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांना कोरोनाची लागण होऊन गेली आहे. यातील अनेकजण बरे झाले तर अनेकांनी जगाचा निरोप घेतला. याशिवाय गेल्या काही दिवसांतदेखील अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. यामध्ये करिना कपूर, अमृता अरोरा, सीमा खान, महिम कपूर यांच्यासह अर्जुन कपूर, त्याची बहीण अंशुला कपूर, रिया कपूर, तिचा पती करण बुलानी, नोरा फतेही, शिल्पा शिरोडकर या कलाकारांच्या नावाचा समावेश आहे.