Take a fresh look at your lifestyle.

OSCAR सोहळ्यातील राड्यावर बॉलिवूडकरांनी दिल्या प्रतिक्रिया; म्हणाले…,

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सिनेसृष्टीतील नामांकित पुरस्कार सोहळा म्हणून ऑस्कर पुरस्काराकडे पाहिलं जात. यंदाचा ऑस्कर हा ९४ वा पुरस्कार सोहळा होता. मोठ्या दिमाखात हा सोहळा लॉस एंजिलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. हा सोहळा अगदी उत्साहात सुरु असता याला हिंसेचं हलकं गालबोट लागलं. निवेदक क्रिस रॉकने विल अभिनेता स्मिथच्या पत्नीवर कमेंट केली आणि त्यामुळे भडकलेल्या विलने थेट स्टेजवर जाऊन क्रिस रॉकच्या कानशिलात लगावली. यामुळे सारा माहोल निशब्द झाला होता. यावरून एकीकडे सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. तर आता बॉलिवूड कलाकारसुद्धा घडलेल्या या प्रकारावर व्यक्त झाले आहेत.

दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री नीतू कपूर यांनी विल स्मिथ आणि क्रिस रॉक यांचा तो फोटो शेअर करत सोशल मीडिया इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी लिहिले कि, ‘.. आणि ते म्हणतात की महिला त्यांच्या भावनांना कधीच नियंत्रित करू शकत नाही.’

याशिवाय अभिनेता वरुण धवनने यावर प्रतिक्रिया देत लिहिले कि, ‘वॉव, असं घडेल अशी अपेक्षा केली नव्हती’. तसेच गायिका सोफी चौधरीने व्यक्त होत म्हटलं कि, ‘हिंसा हा कधीच पर्याय नसतो, पण एखाद्याच्या मेडिकल कंडिशनवरून मस्करी करणंसुद्धा योग्य नाही. माझ्या सर्वांत आवडत्या कलाकाराच्या करिअरमधील ही सर्वांत महत्त्वाची घडामोड होती. मात्र त्याच्या यशापेक्षा या घटनेची चर्चा अधिक होईल.’ याशिवाय बॉलीवूड अभिनेत्री गौहर खानने तिच्या ट्विटर हँडलद्वारे लिहिले आहे की, ऑस्कर जिंकला पण आदर गमावला.

या सर्व प्रकारानंतर मात्र विल स्मिथने खजील होत सोशल मीडियाच्या माध्यामातून क्रिसची माफी मागितली आहे. त्याने या माफीनाम्यात लिहिले कि, ”कोणत्याही प्रकारची हिंसा ही विषारी आणि विनाशकारी असते. काल रात्रीच्या अकॅडमी पुरस्कार सोहळ्यातील माझं वर्तन अस्वीकार्य आणि अक्षम्य होतं. माझ्या खर्चावर विनोद करणं हा कामाचा एक भाग आहे असं मी समजू शकतो. परंतु जेडाच्या मेडिकल कंडिशनबद्दल विनोद केलेलं मला सहन झालं नाही आणि भावनेच्या अधीन झाल्याने मी तसा वागलो. मला जाहीरपणे तुझी माफी मागायची आहे क्रिस. माझी वागणूक मर्यादेपलीकडची होती आणि मी चुकलो. या प्रेमळ जगात हिंसेला स्थान नाही. मी अकॅडमी, शोचे निर्माते, सर्व उपस्थित पाहुणे आणि जगभरातील प्रेक्षकांची माफी मागतो. मी विलियम्स आणि माझ्या किंग रिचर्डच्या कुटुंबीयांची माफी मागतो. माझ्या या वागण्यामुळे त्या सुंदर प्रवासावर एक डाग पडला. मी स्वत:ला सुधारण्याचा प्रयत्न करतोय”.