Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीत दिग्दर्शक वनराज भाटिया यांचे वृद्धापकाळाने निधन

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडच्या अनेक लोकप्रिय व बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करणाऱ्या अनेक चित्रपटांना, मालिकांना आणि जाहिरातींना संगीत देणारे संगीतकार वनराज भाटिया यांचे आज निधन झाले आहे. वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान ते ९३ वर्षांचे होते. वनराज यांनी मुंबईत अंतिम श्वास घेतला. वनराज दीर्घकाळापासून वार्धक्याशी संबंधित आजारांशी लढत होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. १९८८ मध्ये त्यांना ‘तमस’ चित्रपटाच्या संगीतासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

३१ मे १९२७ रोजी जन्मलेले वनराज भाटिया यांनी लंडनच्या रॉयल अ‍ॅकेडमी ऑफ म्युझिक येथून संगीताचे प्रशिक्षण घेतले होते. १९५९ साली ते भारतात परतले. त्यानंतर ते बॉलिवूड इंडस्ट्रीत काम करू लागले. सर्वप्रथम जाहिरातींसाठी जिंगल बनवण्याचे काम त्यांनी केले. त्यांनी सुमारे ७ हजारांहून अधिक जाहिरातींना जिंगलबद्ध केले आहे. १९७२ साली मात्र त्यांना बॉलिवूड इंडस्ट्रीतील मोठा ब्रेक मिळाला आणि वनराज झाले बॉलिवूड संगीतकार वनराज भाटिया.

विख्यात दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या ‘अंकूर’ या चित्रपटासाठी त्यांनी पार्श्वसंगीत दिले. यानंतर त्यांनी १९७०- ८० च्या दशकामध्ये अनेक चित्रपटांना संगीत दिले होते. पुढे गोविंद निहलाणी, प्रकाश झा यांच्या चित्रपटांनाही भाटियांनी संगीत दिले. मंथन, भूमिका, कलयुग,जुनून, मंडी, त्रिकाल, द्रोहकाल, जाने भी दो यारो, सूरज का सातवा घोडा, तमस हे त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचे जिवंत पुरावे आहेत.

अजूबा या एकमेव व्यावसायिक चित्रपटाला त्यांनी संगीत दिले होते. तसेच १९८९ साली त्यांना पद्मश्री पुरस्कार आणि संगीत अकादमीतर्फे गौरविण्यात आले होते. २०१२ साली पद्मश्रीनेदेखील त्यांना सन्मानित करण्यात आले होते. लिरिल साबणाची जाहिरात आणि त्याचे म्युझिक कुणीच विसरू शकत नाही. या जाहिरातीतील चेहरे बदलले पण वनराज भाटियांनी कम्पोज केलेले संगीत मात्र अद्यापही लोकांच्या लक्षात आहे.