Take a fresh look at your lifestyle.

संगीत विश्वाला आणखी एक धक्का; सुप्रसिद्ध बॉलिवूड पॉप सिंगर बप्पी लहरी यांचे निधन

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| काही दिवसांपूर्वीच संगीत विश्वाने लता दीदींच्या रुपात एक सूर गमावला. त्यांच्या निधनानंतर आता कुठे सावरतोच तोवर आणखी एका दिग्गज गायकाने जगाचा निरोप घेतला आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, वयाच्या ६९ व्या वर्षी सुप्रसिद्ध बॉलिवूड सिंगर बप्पी लहरी यांचे आज निधन झाले. यामुळे संपूर्ण कला विश्वात पुन्हा एकदा दुःखाची लाट उसळली आहे. बप्पी लहरी याना बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये बप्पी दा म्हणून ओळखले जायचे. त्यांची गाणी तरुणाईला वेड लावणारी असायची.

बुधवारी सकाळी मुंबईतील क्रिटी केअर रुग्णालयात बप्पी लहरी यांनी अखेरचा श्वास घेतला. याच रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते अशी माहिती मिळाली आहे. गतवर्षी एप्रिल महिन्यात त्यांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर डॉक्टरांकडून त्यांना पूर्ण बेड रेस्ट देण्यात आली होती. परिणामी हालचाल करता यावी यासाठी त्यांच्या जुहुस्थित निवासस्थानी लिफ्ट व्हीलचेअर बसविली होती. तेव्हापासून बप्पी लहरी यांची प्रकृती अस्थिरच होती आणि अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bappi Lahiri (@bappilahiri_official_)

गायक बप्पी लहरी यांचं मूळ नाव अलोकेश लहरी असे होते. त्यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९५२ रोजी जलपैगुडी पश्चिम बंगाल येथे झाला होता. बप्पी दा हे हिंदी सिनेसृष्टीतील गाण्यांमध्ये पॉप म्युझिकसाठी प्रसिद्ध होते. बप्पी यांच्या पॉप म्युझिकने भारतीय संगीत विश्वाला एक वेगळी ओळख निर्माण करण्यास सहाय्य केले. बप्पी यांचं सोन्यावरील प्रेम तर जगजाहीर होतं. त्यांच्या गळ्यात कित्येक तोळ्याच्या सोन्याच्या मोठ्या माळा, जाडजूड अंगठ्या असे दागदागिने असायचे. तसेच त्यांचा लूक नेहमीच रॉकस्टार सारखा असायचा. अखेर या रॉकस्टारने जगाचा निरोप केला आणि पॉप म्युझिकचा बादशहा काळाच्या पडद्याआड गेला.