गायक विशाल दादलानी यांच्या वडिलांचे निधन; इंस्टावर शेअर केली भाऊक पोस्ट
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| पुन्हा एकदा संपूर्ण जगभरात कोरोनाचा कहर दिसून येत आहे. एकीकडे रुग्णसंख्या वाढतेय तर दुसरीकडे मृत्यूचा दर. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, बॉलिवूड जगतातील सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार विशाल दादलानी यांच्या वडिलांचे अर्थात मोती दादलानी यांचे शनिवारी (०८ जानेवारी) निधन झाले आहे. मुख्य माहिती अशी की विशाल स्वतः सध्या कोरोनासोबत लढत असल्यामुळे असहाय्य असल्याचे त्यांना जाणवत आहे. दरम्यान त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
आपल्या वडिलांचे निधन झाले आहे याची माहिती स्वत: विशालने सोशल मीडियाद्वारे दिली आहे. स्वत: कोरोनाविरुद्ध लढताना हा धक्का पचविणे त्यांच्यासाठी फारच त्रासदायक आहे हे त्यांच्या पोस्टमधून दिसून येत आहे. त्यांनी आपल्या वडिलांचा जुना फोटो शेअर करत एक भावुक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये विशाल यांनी लिहिले की, “काल रात्री मी माझा सर्वात चांगला मित्र आणि या पृथ्वीवरील सर्वोत्तम आणि दयाळू व्यक्तीला गमावले. मला आयुष्यात त्यांच्यापेक्षा चांगला पिता, चांगला शिक्षक किंवा चांगला माणूस सापडला नसता. माझ्यामध्ये जे काही चांगले आहे, ते त्यांचेच प्रतिबिंब आहे.”
पुढे लिहिले, “गेले ३/४ दिवस ते आयसीयूमध्ये होते, पण मला कोरोना व्हायरसची लागण झाल्यामुळे कालपासून मी त्यांची भेट घेऊ शकलो नाही. मी माझ्या आईला तिच्या कठीण प्रसंगात सावरण्यासाठीही जाऊ शकत नाही. हे अजिबात योग्य नाही. त्यांच्याशिवाय जगात कसे जगायचे हे मला माहित नाही. मी पूर्णपणे खचलो आहे,” असेही त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले.