मुंबई प्रतिनिधी | नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून देशभर वातावरण पेटलेलं असताना सांस्कृतिक क्षेत्रातील कलावंत मंडळींनीही आपल्या भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीरपणे व्यक्त केल्या आहेत. बॉलिवूडमध्ये दीर्घकाळ काम केलेल्या अमिताभ बच्चन, सलमान खान, आमिर खान, शाहरुख खान, करण जोहर, हृतिक आणि राकेश रोशन, अक्षय कुमार यांच्याकडून मात्र देशभरातील हिंसक वातावरणावर अद्यापही प्रतिक्रिया आलेली नाही. आपले हितसंबंध जपण्यासाठी या कलाकारांनी भूमिका न घेतल्यामुळे यांच्यावर टीका होत आहे. आरजे रोशन अब्बास यांनी तर शाहरुख खानला, “तू जामियाचा विद्यार्थी असून काहीच का बोलत नाहीस?” असा रोखठोक प्रश्न विचारला आहे.
कॅबला विरोध करण्यासाठी देशातील नामवंत विद्यापीठातील विद्यार्थी संघटना पहिल्यांदा शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत असताना पोलिसांनी केलेल्या अतिरेकी कारवायांमुळे या आंदोलनाचा भडका उडाला. विद्यार्थ्यांवर हल्ले होत आहेत हे पाहून अनेक सामाजिक संघटना, वकील, प्राध्यापक आणि कलाकार मंडळींनी आपला विरोध दर्शवायला सुरुवात केली. मागील ३ दिवसांत या आंदोलनाचे लोण देशभर पसरले असून बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अनेकांनी यात उडी घेतली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अफवा पसरवणाऱ्यांपासून दूर रहा असा संदेश ट्विटरवरून दिल्यानंतर अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी आधी भाजपच्या आयटी सेल वाल्यांना अफवा पसरवण्यापासून रोखण्याची विनंती मोदींना केली आहे. रिचा चड्डा, सयानी गुप्ता, रितेश देशमुख, हुमा कुरेशी, अनुराग कश्यप, आलिया भट, सोनाक्षी सिन्हा, सिद्धार्थ मल्होत्रा, श्वेता त्रिपाठी, महेश भट यांनीही सरकारपुरस्कृत हिंसाचारावर टीका करत लोकशाही मार्गाने लढणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला आहे.
आयुष्यमान खुराणा, विकी कौशल, परिणीती चोप्रा, पुलकीत सम्राट, मनोज वाजपेयी यांनीही कडक शब्दांत आपला निषेध सोशल मीडियावर व्यक्त केला. जामिया मिलिया विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असलेल्या दिग्दर्शक कबीर खान यांनी हा देशासाठी दुःखद दिवस असल्याचं मत व्यक्त केलं. विद्यार्थ्यांना संविधानिक पद्धतीने आंदोलन करू दिलं जात नाही, हे चिंताजनक असल्याचंही कबीर पुढे म्हणाले. या सार्वत्रिक निषेधामध्ये मागील वर्षी नरेंद्र मोदिंसोबत सेल्फी काढलेल्या अनेक कलाकारांचा समावेश असल्याने या भूमिकांचा विचार सरकारने करावा अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.
दिया मिर्झा, राजकुमार राव, विशाल भारद्वाज, वरून धवन, स्वरा भास्कर अनुभव सिन्हा, अलंकृता श्रीवास्तव, दानिश अस्लम, भूमी पेडणेकर, कोंकना सेन शर्मा, झिशान आयुब, सोनी राजदान, फरहान अख्तर, पूजा भट्ट या बॉलिवूड आणि मल्याळम चित्रपटसृष्टीतील इतर लोकांनीही कॅबविरोधी विद्यार्थी आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला आहे.
Discussion about this post