Take a fresh look at your lifestyle.

ऍसिड हल्ल्यानंतरच्या लढ्याची ज्वलंत प्रेरणा देणारा – छपाक | Chhapaak Review

Chhapaak Review | सगळं काही सुरळीत चाललेलं असतं आणि अचानकच सगळं उध्वस्त होतं. या ‘अचानक’चे संदर्भ दुसऱ्याला जाणीवपूर्वक त्रास द्यायच्या हेतूने असतील तर काय होतं याची वास्तव कहाणी म्हणजे छपाक.

आप मेरी सुरत बदल सकते हैं, मेरा मन नहीं..!! या मध्यंतराच्या वाक्यात हल्ला झालेल्या मुलींची मानसिकता किती खंबीर असू शकते हे आपल्याला जाणवतं. आपल्याविरुद्ध झालेल्या अन्यायाविरुद्ध लढायचं म्हटल्यावर समोरून कितीही आमिष आली, अडचणी आल्या तरी मागे हटायचं नाही. एवढा भारी भरकम संदेश सोप्या भाषेत देणारा ‘छपाक’ने बॉक्स ऑफिसवर दमदार एन्ट्री मारली आहे.

लक्ष्मी अग्रवाल या ऍसिड हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीच्या जीवनावर आधारलेला छपाक हा चित्रपट. दिपीका पदुकोणने (मालती अग्रवाल) ऍसिड हल्ल्याला बळी लक्ष्मीची भूमिका साकारली आहे. मुलींवर एकतर्फी प्रेम करण्यातून, त्यांच्या शिक्षण घेऊन अधिक शहाण्या होण्यातून त्रासलेल्या पुरुषी मानसिकतेतून चाकूने भोसकून मारणे, बलात्कार करणे, ऍसिड हल्ला करणे या गोष्टी भारतीय समाजाला नव्या नाहीत. लक्ष्मीच्या रुपाने ऍसिड हल्ल्याची केस ही जखमी करण्याच्या उद्देशाने केलेला गुन्हा (IPC 326) असू शकत नाही, तो जीवघेणा हल्ला म्हणूनच ग्राह्य धरला पाहिजे यासाठी लक्ष्मीने जो लढा दिला त्याची कहाणी ‘छपाक’मधून दाखवली आहे.

मालती ही कॉलेजमध्ये शिक्षण घेणारी युवती. संगीत क्षेत्रात करियरची इच्छा असलेल्या मालतीला बब्बू नावाच्या ओळखीच्या व्यक्तीकडूनच प्रेमासाठी विचारणा होत असते. मालती त्याच्याशी बोलायला, भेटायला टाळाटाळ करू लागल्यानंतर तो आपल्या बहिणीच्या मदतीने तिच्यावर ऍसिड हल्ला करतो. या हल्ल्यानंतरही आरोपीला मिळणारी निवांत वागणूक ही पीडित व्यक्तीला किती त्रासदायक आहे हे चित्रपट पाहताना समजतं.

या लढ्यात मालतीसोबत धीराने उभ्या राहिलेल्या तिच्या वकिलांचा आणि सामाजिक काम करणाऱ्या छाया संघटनेचा वाटा किती महत्त्वाचा आहे हे चित्रपट पाहिल्यावरच समजेल. विक्रांत मस्सी या कलाकाराने मालतीला सहाय्य करणाऱ्या सहकलाकाराची भूमिका उत्तम बजावली आहे. हल्ला सोसणाऱ्या व्यक्तीला भोगाव्या लागणाऱ्या यातना या बाकी लोकांना समजतातच असं नाही. हल्ल्यानंतरच्या जीवनातला संघर्ष लोकांना समजण्यासाठी छपाक हा पहावाच लागेल.

अभिनयाच्या बाबतीत दीपिका एकदम सरस ठरली आहे. हल्ला झाल्यानंतर भोगाव्या लागलेल्या वेदना, समाजाकडून बऱ्या-वाईट हेतूने विचारलेले प्रश्न आणि हलाखीची कौटुंबिक परिस्थिती या सर्वांशी झगडत पुढे गेलेली लक्ष्मी दीपिकाच्या रूपाने पडद्यावर पहायला मिळते. ऍसिड हल्ल्यात मृत्यू पावलेल्या एका महिलेबाबत बोलताना मालती म्हणते, “बरं झालं तिची सुटका झाली, नाहीतर हल्ला झाल्यानंतरही कोर्ट आणि मीडियाच्या फेऱ्यात अडकून पडणं खूप त्रासदायक आहे.” भारतीय समाजव्यवस्थेचं विदारक वास्तवच या वाक्यातून दिसून येतं.

चित्रपटाचं संगीत दर्जेदार असून गाण्यांमध्ये वापरलेल्या शब्दांचा अर्थ खूपच परिणामकारक आहे.

२०१३ साली ऍसिड हल्ल्यात जखमी झालेल्यांची संख्या 113 होती, 2017 ला ती 252 झाली आणि या प्रकारचा शेवटचा हल्ला २०१९ च्या ऑक्टोबर महिन्यामध्ये झाला आहे. ऍसिड रेग्युलेशन आणि ऍसिड बॅन यामध्ये अजूनही वादविवाद सुरुच असून लक्ष्मीने आपला लढा थांबवलेला नाही. शिवरायांच्या मावळ्यांचा गौरवशाली इतिहास तान्हाजीच्या रुपात पाहताना धैर्यवान लक्ष्मीच्या छपाकला जाणंही गरजेचं आहेच.

योगेश जगताप

9561190500

Comments are closed.

%d bloggers like this: