Take a fresh look at your lifestyle.

”काळजात आग अन् डोळ्यात जाग मागं नाय हटायचा मराठी वाघ”; ‘छावा-दि ग्रेट वॉरियर’ लवकरच..

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही वर्षांपासून सिनेसृष्टीत इतिहासाची सुवर्ण पाने उलघडण्याचा प्रयत्न करणारे अनेक सिनेमा येऊन गेले. यातील काही हिट झाले तर काही काळजात फिट्ट झाले. यानंतर आता मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती, संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘छावा- दि ग्रेट वॉरियर’ या चित्रपटाचा मुहूर्त पार पडतोय. डॉ. जयसिंगराव पवार यांनी लिहिलेल्या‘छत्रपती संभाजी महाराज’ या ग्रंथावर आधारित ‘छावा- दि ग्रेट वॉरियर’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शौर्य, साहस आणि वीर म्हणजे काय..? हे जाणून घेण्याची संधी नव्या पिढीला मिळणार आहे.

मल्हार पिक्चर्स प्रस्तुत, वैभव भोर आणि सनी रजानी निर्मित तसेच राहुल जनार्दन जाधव दिग्दर्शित ‘छावा- दि ग्रेट वॉरियर’ या चित्रपटात संभाजी महाराजांच्या साहस आणि शौर्याची गाथा दर्शविली जाणार आहे. त्यामुळे आपल्या ‘छावा- दि ग्रेट वॉरियर’ या चित्रपटाबद्दल बोलताना चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल जनार्दन जाधव म्हणाले कि, ” शंभूराजे खरे ‘युथ आयकॉन’ आहेत. वयाच्या नवव्या वर्षांपासून राजकारणाचे धडे घेत असलेल्या स्वराज्याच्या पहिल्या युवराजांची फक्त युद्ध कौशल्यावरच नाही तर, चौदा भाषांवर आणि साहित्यावर देखील मजबूत पकड होती. कल्पनेतल्या सुपर हिरोंपेक्षा वास्तवातील सुपरहिरोवर सिनेमा बनवण्याची इच्छा होती. जी ‘छावा- दि ग्रेट वॉरियर’मधून पूर्ण होतेय.”

 

याशिवाय इतिहासकार आणि कादंबरीकार लेखक डॉ. जयसिंगराव पवार यांनी व्यक्त होताना सांगितले कि, “असिम त्याग, पराकोटीची सहनशीलता, जाज्वल्य देशाभिमान आणि हौतात्म्याचे प्रतिक म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. विविध विद्या, शास्त्रे आणि पुराणे यांचा गाढा व्यासंग असलेला हा मराठ्यांच्या छावा. आजच्या पिढीला शंभुराज्यांच्या कर्त्तृत्वाची प्रचिती ह्या सिनेमातून येईल, असा मला विश्वास आहे.” तर चित्रपटाचे निर्माते सनी रजानी म्हणाले कि, “जगातील पहिल्या बुलेटप्रूफ जॅकेटचा शोध संभाजी महाराजांनी लावला. सर्वात पहिली जैविक लढाई शंभूराजांनी बुद्धीने लढली. मोगलांना वाकवणारा, इंग्रजांना नाचवणारा, पोर्तुगीजांना झुकवणारा, सीद्दीला दर्यात बुडवणारा, एकाही लढाईत न हरलेला शेवटच्या श्वासापर्यंत अजेय ठरलेला शंभुराजांसारखा छत्रपती स्वराज्याला लाभला हे आपलं भाग्य आहे आणि त्यांच्या संघर्षमयी आणि गतीमान आयुष्यावर चित्रपट निर्मिती करण्याचं भाग्य आम्हांला मिळालं. ह्यासाठी आम्ही खूप खुश आहोत.”