Take a fresh look at your lifestyle.

लहान मुलांचा सुपर हिरो ‘शक्तिमान’ अवतरणार रुपेरी पडद्यावर; पहा व्हिडीओ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रत्येकाच्या लहानपणी त्यांचा आवडता सुपरहिरो असतोच. तुमचाही होता असेल नाही का..? ‘स्पायडरमॅन’, ‘सुपरमॅन’, ‘शक्तिमान’..? एकदम देसी हिरो म्हणजे शक्तिमान . साधारण ९०’च्या दशकात DD नॅशनलवर एक प्रसिद्ध टीव्ही मालिका प्रसारित व्हायची जिचं नाव ‘शक्तिमान‘ होतं. हि मालिका अशी आहे जी अजूनही लोकांच्या लक्षात आहे. या मालिकेतील नायक लहान मुलांसाठी सुपर हिरो कधी झाला तेच कळलं नाही. यानंतर आता हा सुपरहिरो मोठ्या पडद्यावर वेगळ्या अवतारात येतोय. होय. शक्तिमान आता चित्रपट रूपात वेगळ्यत ढंगात प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.

शक्तिमान या मालिकेत अभिनेते मुकेश खन्ना यांनी सुपरहिरो ‘शक्तिमान’ची भूमिका साकारली होती. मात्र, आता हीच मालिका छोट्या पडद्यानंतर रुपेरी पडद्यावर सिनेमा स्वरूपात येण्यास सज्ज होतेय. या चित्रपटाची घोषणा सोनी पिक्चर्सने केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक शानदार व्हिडिओही शेअर केला आहे. यामध्ये ‘शक्तिमान’ची एक खास झलक पहायला मिळत आहे. सोनी टीव्हीच्या अधिकृत सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत ‘शक्तिमान’चा चेहरा दिसत नसला तरीही मनुष्यरूपी गंगाधरचा गोल गोल चष्मा दिसतोय. हा चष्मा मालिकेच्या काळात खूप प्रसिद्ध झाला होता. यासोबत एक आयकार्डही दिसतंय ज्यात कोणताही फोटो नाही. सोनी पिक्चर्सच्या घोषणेनंतर ‘शक्तिमान’ मालिकेच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण आहे. आता उत्सुकता एकच कोण साकारणार ‘शक्तिमान’ची भूमिका..?

या व्हिडिओसोबत सोनी पिक्चर्सने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “भारत आणि जगात आमच्या अनेक सुपरहिरोंच्या सिनेमांच्या यशानंतर आपल्या देसी सुपरहिरोची वेळ आली आहे. सोनी पिक्चर्स इंटरनॅशनल प्रोडक्शन शक्तिमानला आणण्यासाठी सज्ज आहे आणि आयकॉनिक सुपरहिरोची जादू पुन्हा एकदा तयार करेल. ‘ब्रूइंग थॉट्स प्रायव्हेट लिमिटेड’ आणि मुकेश खन्ना यांच्या भीष्म इंटरनॅशनलच्या संयुक्त विद्यमाने या सिनेमाची निर्मिती केली जात आहे. शक्तिमान सिनेमासाठी सज्ज व्हा. इतर माहिती लवकरच येईल. तुम्ही उत्साहित आहात का?”

DD नॅशनल वर प्रसारित होणारी ‘शक्तिमान’ ही मालिका १३ सप्टेंबर, १९९७ रोजी टेलिकास्ट झाली होती. या मालिकेने २७ मार्च, २००५ पर्यंत छोट्या प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. या मालिकेत मुकेश खन्ना यांच्याव्यतिरिक्त किटू गिडवानी आणि वैष्णवी महंत मुख्य भूमिकेत होते. यानंतर ही मालिका लॉकडाऊनदरम्यान पुन्हा एकदा टेलिकास्ट करण्यात आली होती. याहीवेळी या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. माहितीनुसार, तेव्हाच निर्माते या सिनेमाची निर्मिती करण्याची योजना बनवत होते.