Take a fresh look at your lifestyle.

‘द काश्मीर फाईल्स’मधील बिट्टाला प्रेक्षकांकडून शिव्यांचा प्रसाद; अभिनेता चिन्मय मांडलेकर म्हणतो..

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी ऐतिहासिक चित्रपट ‘पावनखिंड’मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि ‘द काश्मीर फाईल्स’मध्ये दहशतवादी क्रूर बिट्टा या दोन्ही भूमिका अतिशय टोकाच्या, आव्हानात्मक आणि अनोख्या होत्या. पण या दोन्ही भूमिकांना अभिनेता चिन्मय मांडलेकर याने योग्य न्याय मिळवून दिला आहे. दरम्यान पावनखिंडीमध्ये चिन्मयने साकारलेले छत्रपती शिवाजी महाराज लोकांना इतके भावले कि लोक त्याच्यासमोर आदराने झुकू लागले आहेत. तर द काश्मीर फाईल्समधील क्रूर बिट्टाला पाहून लोकांनी अक्षरशः शिव्या, शाप दिल्या आहेत. इतकेच नव्हे तर चपलेने मारण्यासाठी देखील लोक सरसरवले असताना हि भूमिका साकारणारा चिन्मय मांडलेकर याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकर याने एका मुलाखतीत बोलताना “समोर असता तर चपलेनं मारलं असतं असं जेव्हा लोक म्हणतात..” तेव्हा त्याला काय वाटत हे सांगितलं आहे. दरम्यान चिन्मय म्हणाला, “मी याकडे कौतुक म्हणूनच बघतो. जेव्हा लोक म्हणतात आम्हाला तुमचा राग येतो, तुम्ही आमच्यासमोर असता तर चपलेनं मारलं असतं, तर ही माझ्यासाठी प्रशंसाच आहे. लोकांचा त्या व्यक्तीरेखेवर राग आहे, वैयक्तिक आयुष्यात तर ते चिन्मय मांडलेकरला ओळखतात. जसं एखाद्या हिरोचा डान्स आवडला तर त्याला आपण कॉपी करण्याचा प्रयत्न करतो, टाळ्या वाजवतो. तसंच जर आपल्याला एखाद्या व्हिलनचं काम आवडलं तर तुम्हाला रागच आला पाहिजे. तो राग येत असेल तर मी माझं काम ठिकठाक करतोय असं मला वाटतं.”

पुढे म्हणाला कि, “आता चित्रपट पाहिल्यानंतर लोकांच्या मनात बिट्टाविषयी ज्या भावना आहेत, जो राग आहे, तो मला स्क्रिप्ट वाचताच आला होता. मी विवेकजींना विचारलं होती की हे खरं आहे का? ते हो म्हणाले. तेव्हा अशा मानसिकतेचे लोक कसा विचार करत असतील, याचा विचार मी करत होतो. ज्याच्यासाठी एखाद्याचा जीव घेणं म्हणजे रोजचं काम असेल, तो कसा असेल? याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही.

पण अभिनय यालाच म्हणतात की तुम्हाला अशा अनेक भूमिका साकाराव्या लागतात, ज्यांच्याशी तुम्ही कदाचित रिलेटसुद्धा करू शकत नाही.” पावनखिंड आणि द काश्मीर फाईल्स या दोन्ही चित्रपटातील भूमिका टोकाच्या होत्या आणि या भूमिकांना प्रेम मिळो वा राग हि पोचपावती आहे असं आपल्याला वाटत आहे असे चिन्मयने सांगितले.